सातार्डा येथे मायलेकाची तेरेखोल नदीत उडी; दोघांचा शोध सुरू; सावंतवाडी व गोवा पोलिसांकडून नदीपात्रात शोधमोहीम
03:19 PM Oct 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
सातार्डा | वार्ताहर : सातार्डा-रायाचेपेड येथील आई आणि तिच्या मुलाने रविवारी पहाटे तेरेखोल नदीपात्रात उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. श्रुतिका श्यामसुंदर आरोंदेकर (वय 55) आणि त्यांचा मुलगा तुकाराम ऊर्फ सुहास श्यामसुंदर आरोंदेकर (वय 26) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेनंतर सावंतवाडी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून, गोवा पोलिसांकडूनही बोटीच्या सहाय्याने नदीपात्रात शोध घेण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे मायलेकाने तेरेखोल नदीत उडी घेतल्याची माहिती समोर आली. नदीकिनारी त्यांच्या चपला आढळून आल्याने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले.
Advertisement
गोवा पोलिसांनीही बोटीच्या सहाय्याने नदीपात्रात शोध घेतला. सावंतवाडी पोलिसांकडूनही शोधमोहीम सुरू असून, दोघांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
घटनास्थळी पोलीस पाटील विनिता मयेकर, सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि सातार्डा बिट अंमलदार टकेकर उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर आणि पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये यांनीही घटनास्थळी भेट दिली.
Advertisement
मायलेकाने नदीत उडी घेण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.
Advertisement
