Asian Relay Championship | साताऱ्याच्या कन्येची आशियात सुवर्णझेप! चीनमध्ये भारताचा डंका; सुदेष्णा शिवणकरला दुसरं गोल्ड मेडल
सातारा - चायना येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला ४×१०० मीटर आशियाई रिले चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत भारतीय महिला धावपटूंनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या ऐतिहासिक यशामध्ये सातारा जिल्ह्याची कन्या सुदेष्णा शिवणकर हिने महत्त्वपूर्ण योगदान देत अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याचा मान मिळविला आहे.भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत उत्कृष्ट समन्वय, वेग आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांना मागे टाकले. या विजयामुळे भारताचा तिरंगा आशियाई क्रीडा मंचावर दिमाखात फडकला असून देशाचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
साताऱ्याच्या सुदेष्णा शिवणकर हिने यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यानंतर केवळ १५ दिवसांत पुन्हा एकदा सुवर्णयश मिळवत तिने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीची छाप उमटवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
साताऱ्याच्या मातीतून अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षक बळवंत बाबर यांनी घडविलेल्या सुदेष्णा शिवणकरने मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा झेंडा उंचावत जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.
तिच्या पुढील स्पर्धांसाठीही सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सुदेष्णाच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशिक्षक, विविध सामाजिक संघटना तसेच नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही तिच्या कामगिरीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी ही कामगिरी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
विशेष बाब...
दि.२० व २१ जून रोजी चीनमधील शांग्यू येथे झालेल्या "एशियन रिले ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत" साताऱ्यातील खर्शी गावची २३ वर्षीय सुवर्णकन्या सुदेष्णा हणमंत शिवणकर हिने भारत देशाच्या महिला (४ x १००)मीटर रिले संघात सहभागी होऊन तिने धावण्याची अप्रतिम कामगिरी करीत आपल्या भारत देशासाठी सुवर्ण पदक जिंकले आहे. सुदेष्णा शिवणकर हीला भारतातील सर्वात वेगवान खेळाडू धावपटू म्हणुन ओळखले जाते.या स्पर्धेत आशिया खंडातील सर्व २० देश सहभागी झाले होते.४३.८५ सेकंद नोंदवून भारतीय महिला खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक जिंकले आहे.तर चीनला दुसऱ्या क्रमांकावर सिल्वर आणि थायलंडला तिसऱ्या क्रमांकावर ब्राँझ मेडल प्राप्त झाले आहे.