धक्कादायक ! मित्राच्या मृत्यूचा मनावर खोल परिणाम; धक्क्यातून सावरलीच नाही, हॉस्टेलमध्ये केला आयुष्याचा शेवट
सातारा : कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन परतताना झालेल्या भीषण रस्ते अपघातात जवळच्या मित्राचा मृत्यू झाल्याने मानसिक धक्क्यात असलेल्या एका विद्यार्थिनीने साताऱ्यातील वसतिगृहात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पूजा माने असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती खटाव तालुक्यातील मानेवाडी येथील रहिवासी होती. या घटनेमुळे शैक्षणिक परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दसऱ्यानिमित्त कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गेलेले काही तरुण दर्शन आटोपून स्कॉर्पिओ गाडीतून परतत होते. रविवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कराडजवळ पुणे-बंगळूर महामार्गावरील उड्डाणपुलावर त्यांच्या वाहनाची ट्रकशी जोरदार धडक झाली. या अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले.
या दुर्घटनेत पूजाच्या जवळच्या मित्राचाही मृत्यू झाला होता. या घटनेचा पूजाच्या मनावर खोल परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर साताऱ्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या वसतिगृहात तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. तिच्या मृत्यूमुळे सहकारी विद्यार्थी आणि परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे तेजस देशमुख (२५), सागर निंबाळकर (२३), सुयश चिंचकर (२०) आणि रोहित धोत्रे (२१) अशी आहेत. ऋतुराज दुबळे (२१), शंतनू शिंगाडे (२०) आणि अमन तांबोळी (२३) हे तिघे जखमी झाले होते.
या दोन्ही घटनांची नोंद पोलिसांकडे करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनांमुळे संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
