Sangli Satara Vidhan Parishad Election: सातारा-सांगली विधान परिषदेसाठी उमेदवारी डावलल्याने शेखर गोरे आणि समर्थकांचा नाराजीचा सूर
12:30 PM Jun 02, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
नाराज शेखर गोरे यांचे मिशन २०२९?
BY - एकनाथ वाघमोडे
वावर हिरेत: विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने शेखर गोरे यांचा फोटो आणि 'मिशन २०२९' असे लिहिलेले सोशल मीडिया बॅनर व्हॉट्स ॲपवर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठी हा मोठा इशारा मानला जात आहे. उमेदवारी न मिळाल्याने माण-खटावमध्ये दोन्ही भावातील संपलेला राजकीय संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांना सातारा सांगली विधानपरिषद मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती.
मात्र अचानक भाजपने माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना उमेदवारी मिळाल्याने शेखर गोरे आणि समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावनिक साद घालणारी पोस्ट शेखर गोरे यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर झळकती आहे.
परिणामी मंत्री गोरे यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळाला होता. शेखर गोरे यांनी भाजपची साथ देण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा शेखर गोरे यांना विधानमंडळात काम करण्याची संधी देऊ, असे म्हटल्याचा व्हीडिओ खुद्द माढा लोकसभा येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कुळकजाई येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दाखवला होता.
त्यावेळच्या कार्यकर्त्यांना जाहीरपणे आश्वासन निर्णय घेत शेखर गोरेंनी भाजपची साथ देऊन मंत्री गोरेंची ताकद वाढवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. अनेक वर्षांचा राजकीय संघर्ष संपवून दोन भाऊ एकत्र आल्याने माण खटाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
शेखर गोरे यांना अपेक्षित असलेली विधानपरिषद मिळण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे स्वतः लक्ष घालतील अशी अपेक्षा होती. मात्र मंत्री गोरे यांनी पक्षाचा निर्णय तोच माझा निर्णय म्हणत, शेखर गोरेंच्या आमदारकीचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या दिशेने भिरकावला.पक्षश्रेष्ठींनी रिक्त झालेल्या विधानपरिषद जागेवर शेखर गोरे यांना संधी न देता यादीत नावसुद्धा समाविष्ट केले नाही.
त्यानंतर होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत सातारा-सांगलीची जागा भारतीय जनता पार्टीसाठी राखीव झाल्याने शेखर गोरे यांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे स्वतःला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले. यावेळी तरी मंत्री जयकुमार गोरे हे आपल्या भावासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आली
स्वतः शेखर गोरेंनाही होती. मात्र मंत्री गोरे यांनी नेहमीप्रमाणे शेखर गोरेंच्या आमदारकीचा विषय पक्षश्रेष्ठींकडे सोपवला. त्यामुळे शेखर गोरे यांनी विधानसभा, म्हाडा, नगरपरिषद निवडणुकीत केलेल्या मदतीची मंत्री जयकुमार गोरे हे पराफेड करतील, ही अपेक्षाही संपून गेली.
काल अचानकपणे मंत्री जयकुमार गोरे यांचे निकटवर्तीय मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना भाजपकडून सातारा सांगली विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे शेखर गोरे आणि समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून माझ्या कार्यकर्त्यांना कुणी त्रास दिला तर राजकारण बाजूला ठेवून हिशोब चुकता करू असा सज्जड इशारा शेखर गोरे यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यान शमलेला दोन्ही गोरे बंधूंमधील राजकीय वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.एकूणच, शेखर गोरे हे २०२९ मधील आगामी विधानसभेत मंत्री जयकुमार गोरे यांना पराभूत करण्याचा प्रयत्न करणार? गोरे बंधूंमधील संपलेला राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येणार? नेमकी कोणती भूमिका घेऊन आपली राजकीय दिशा ठरवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सोशल मीडियावरील पोस्टचा मजकूर
...तर हिशोब चुकता करू
मी शांत आहे पण संत नाही. माझे सोडा पण माझ्या सहकाऱ्यांना त्रास झाला तर शेखर गोरे गप्प बसणार नाही, मग तो कुणी पण असू दे! राजकारण राहील बाजूला पण हिशोबच चुकता करीन.
Advertisement
Advertisement