For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सातारा, सांगली, अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय पक्षांचे वर्चस्व; प्रतिष्ठेच्या लढतींचे निकाल जाहीर; सांगलीत काँग्रेस-शरद पवार राष्ट्रवादीला आघाडी

05:34 PM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
सातारा  सांगली  अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय पक्षांचे वर्चस्व  प्रतिष्ठेच्या लढतींचे निकाल जाहीर  सांगलीत काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादीला आघाडी
Advertisement
सोलापूर : राज्यातील सातारा, सांगली आणि अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या तिन्ही जिल्ह्यांतील काही जागांवर यापूर्वीच उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. मात्र, उर्वरित जागांवर झालेल्या निवडणुकीत अनेक प्रतिष्ठेच्या लढती रंगल्या होत्या. या लढतींच्या निकालानंतर जिल्हा बँकांमधील राजकीय समीकरणे स्पष्ट झाली आहेत. साताऱ्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी यश मिळवले, तर सांगलीत काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी अनुकूल संख्याबळ मिळाले. अहिल्यानगरमध्ये विखे-थोरात यांच्या सहकार विकास पॅनलने महत्त्वाच्या जागांवर विजय मिळवला.

सातारा जिल्हा बँकेत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार विजयी

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विविध गटांतील उमेदवारांनी विजय मिळवला. काही जागांवर आधीच बिनविरोध निवड झाल्याने निवडणुकीच्या निकालात त्यांचाही समावेश आहे.

Advertisement

भाजपकडून सर्जेराव सावंत यांनी सोसायटी गटातून, जयकुमार गोरे यांनी माण गटातून, ज्ञानदेव रांजणे यांनी जावळी गटातून, अर्जुन काळे यांनी भटक्या-विमुक्त गटातून विजय मिळवला. अतुल भोसले सर्वसाधारण गटातून, सोमनाथ धुमाळ गृहनिर्माण गटातून, रणजीतसिंह नाईक निंबाळकर पतसंस्था-पतपेढी गटातून, नंदकुमार मोरे खटाव सोसायटी गटातून आणि चंद्रकांत जाधव मजूर-विणकर गटातून बिनविरोध निवडून आले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्यजित वीर वाई सोसायटी गटातून, मकरंद पाटील खरेदी-विक्री संघातून, ऋतुजा पाटील वाठारकर महिला राखीव गटातून बिनविरोध निवडून आले. उदयसिंह पाटील उंडाळकर कराड सोसायटी गटातून, रूपाली राजापुरे महाबळेश्वर सोसायटी गटातून, योगेश फडतरे इतर मागासवर्गीय गटातून आणि सुनील माने कोरेगाव सोसायटी गटातून विजयी झाले.

Advertisement

शिवसेनेकडून मंत्री शंभूराज देसाई पाटण सोसायटी गटातून, संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण सोसायटी गटातून, मंगल पाटील महिला राखीव गटातून आणि दीपक चव्हाण अनुसूचित जाती गटातून निवडून आले.

अहिल्यानगरमध्ये विखे-थोरात सहकार विकास पॅनलची बाजी

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील दहा जागांचे निकाल जाहीर झाले. विखे-थोरात यांच्या सहकार विकास पॅनलने या निवडणुकीत महत्त्वाचे यश मिळवले.

सहकार विकास पॅनलकडून प्राजक्त तनपुरे राहुरी विविध कार्यकारी सेवा संस्था गटातून, आशुतोष काळे शेतीपूरक संस्था गटातून, अनुराधा नागवडे आणि संगीता वाघ महिला राखीव गटातून, गणपत सांगळे भटक्या जमाती गटातून, वैभव पिचड अनुसूचित जाती-जमाती गटातून आणि कारभारी जावळे इतर मागासवर्गीय गटातून निवडून आले.

सहकार परिवर्तन पॅनलकडून खासदार निलेश लंके यांनी पारनेर विविध कार्यकारी सेवा संस्था गटातून विजय मिळवला. राम शिंदे प्रणित गटाकडून ज्योती शिंदे कर्जत विविध कार्यकारी सेवा संस्था गटातून विजयी झाल्या. अकोले विविध कार्यकारी सेवा संस्था गटातून अपक्ष संजीवनी शिंदे यांनी बाजी मारली.

या निकालामुळे अहिल्यानगर जिल्हा बँकेतील सहकार विकास पॅनलचे स्थान मजबूत झाले असून, आगामी काळात बँकेच्या कारभारात या निकालाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.

सांगली जिल्हा बँकेत काँग्रेस-शरद पवार राष्ट्रवादीला सत्तास्थापनेची संधी

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आले. एकूण 21 संचालक जागांपैकी 15 जागांवर यापूर्वीच उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित सहा जागांवरील निवडणुकीतही अनेक महत्त्वाच्या लढती झाल्या.

काँग्रेसकडून विश्वजीत कदम, महेंद्र लाड, पूजा पाटील आणि वर्षा सावंत हे बिनविरोध निवडून आले होते. मतमोजणीत अण्णासाहेब कोरे आणि कृष्णा कांबळे यांनी विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसचे एकूण सहा संचालक झाले.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवराज पाटील, वैभव शिंदे आणि विराज नाईक हे बिनविरोध निवडून आले होते. संभाजी कचरे यांनी निवडणुकीत विजय मिळवला.

भाजपकडून गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला, तर सतीश देशमुख, अपर्णा देशमुख, राहुल महाडिक आणि पृथ्वीराज पाटील हे बिनविरोध निवडून आले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून अजितराव घोरपडे यांनी विजय मिळवला, तर रणधीर नाईक बिनविरोध निवडून आले. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून तानाजी पाटील, अमोल बाबर आणि नितीन होनराव हे बिनविरोध निवडून आले. अपक्ष म्हणून संजयकाका पाटील यांनी विजय मिळवला.

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संख्याबळ सत्तास्थापनेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे बँकेच्या आगामी नेतृत्व निवडीकडे राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

तीन जिल्ह्यांच्या निकालांकडे सहकार क्षेत्राचे लक्ष

सातारा, सांगली आणि अहिल्यानगर जिल्हा बँकांच्या निवडणूक निकालांमुळे सहकार क्षेत्रातील राजकीय प्रभाव पुन्हा अधोरेखित झाला आहे. स्थानिक नेतृत्व, पक्षीय आघाड्या आणि सहकारी संस्थांमधील मतदारांचे समीकरण या निवडणुकांत निर्णायक ठरले. आता या बँकांमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

Advertisement
Tags :

.