Satara : राष्ट्रीय महामार्गावर ४ जिल्ह्यातील आरटीओ पथके करणार विशेष तपासणी
गोडोली प्रतिनिधी
वेग मर्यादेचे उल्लंघन, चुकीच्या मार्गाने जाणारे, सीट बेल्ट वापर, रस्त्याच्या कडेला अवैध पार्किंग, उतारावर न्युट्रल करुन धावणाऱ्या वाहने,महामार्गावर दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनांची तपासणी होणार आहे. तसेच अपघात घडणाऱ्या स्पॉट कमी करण्यासाठी आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाची पथके सातत्याने तपासणी करणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांवर कारवाई सुरू झाली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.
पुणे ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी परिवहन आयुक्तांनी आदेश दिले असून प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे, सातारा, सांगली , कोल्हापूर,कराड कार्यालयाच्या पथकांकडून सकाळी , रात्री उशिरापर्यंतही तपासणी केली जाणार आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात या विशेष तपासणी मोहिमेवर देखरेख, नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील (कोल्हापूर) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर तपासणीत वेगमर्यादेचे उल्लंघन करुन धावणारी वाहने, चुकीच्या मार्गाने जाणारी वाहने, सीटबेल्ट न वापरणारे चालक, रस्त्याच्या कडेला अवैधरित्या उभी केलेली वाहने, उतारावर न्युट्रल गेअरमध्ये चालवणारी जड माल वाहतूक वाहने, महामार्गावर दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न करणारे वाहन धारक, वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर आता थेट कारवाई केली जाणार आहे.
महामार्गावरील वारंवार अपघात होणाऱ्या ब्लॅकस्पॉटची दुरुस्ती करुन घेण्यासाठी संबंधीत विभागाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.या महामार्गावर वाहनधारकांसाठी स्थापन केलेल्या समुपदेशन कक्षाद्वारे सकाळी ८ ते सायं.६ पर्यंत समुपदेशनाचे केले जाणार आहे. विशेषत: घाटात ज्या ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्रांचे प्रमाण अधिक आहे त्या ठिकाणी अधिकाधिक अपघात विषयक जनजागृती तसेच तपासणी करून तसेच वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी उपाय योजना होणार आहेत.
सर्व वाहन धारकांना महामार्गावर रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूकीच्या शिस्तीचे पालन करा,वेगमर्यादेचे उल्लंघन करु नये, नेहमी सीटबेल्टचा वापर करावा, रस्त्याच्या कडेला अवैधरित्या वाहन पार्किंग करु नये, उतारावर न्युट्रल गेअरमध्ये वाहन चालवू नका. मोटार वाहन कायद्यातील नियमांचे तंतोतंत पालन करु या.हा महामार्ग विना अपघात वाहन चालवण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.
.