Satara Rain Update: पहिल्याच पावसात वाहून गेला 90 कोटींचा रस्ता, महाबळेश्वर-तापोळा वाहतूक ठप्प
त्यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना मोठा फटका बसला आहे
महाबळेश्वर : नुकताच मार्च अखेरीस सुमारे ९० ते १०० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला महाबळेश्वर-तापोळा रस्ता पहिल्याच पावसात चिखली गावच्या हद्दीतून पूर्णतः वाहून गेला आहे. या दुर्घटनेमुळे महाबळेश्वर-तापोळा दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना मोठा फटका बसला आहे.
सदरचा रस्ता महाबळेश्वरपासून तापोळ्यापर्यंत रुंदीकरणासह बांधकाम विभाग आणि खाजगी ठेकेदाराच्या सहकार्याने पूर्ण झाला होता. मात्र पावसाच्या पहिल्याच खसाखशीत आगमनात रस्त्याचा टिकाव सुटला. त्यामुळे या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक याविषयी संताप व्यक्त करत आहेत.
स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून भविष्यात तीन महिन्यांच्या मुसळधार पावसात हा रस्ता तग धरू शकेल का? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. सध्या महाबळेश्वर-तापोळा मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून, हा घाटरस्ता प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनला आहे.