Crime News : साताऱ्यातील तीन सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार, पोलीसांची कारवाई
तीन इसम सातारा शहर परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते
सातारा : सातारा शहर परिसरात सातत्याने शरीराविरूद्धचे व मालमत्तेविरूध्दचे गुन्हे करणाऱ्या टोळीतील तीन सराईत गुन्हेगारांना सातारा पोलिसांनी दोन वर्षांकरीता तडीपार केले आहे. अकिब कासिम नंदगळकर (वय 30, रा. शाहुपुरी, सातारा), टोळी सदस्य शाहरुख शमशुद्दीन पठाण (वय 25, रा. शनिवार पेठ, सातारा), शाहरुख नौशाद खान (वय 30, रा. सोमवार पेठ, सातारा) अशी त्याची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी या टोळीस संपूर्ण सातारा जिह्यातून तसेच पुणे जिह्यातील भोर, बारामती, पुरंदर तालुका, सांगली जिह्यातील कडेगाव, वाळवा तालुक्यातून सोलापूर जिह्यातील माळशिस तालुक्यातून दोन वर्षे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केलेला होता. या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी केली होती.
या टोळीतील इसमांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांच्या गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील इसम हे सातारा शहर परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते. त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे सातारा तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. अशा टोळीवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करण्याची मागणी होत होती.
त्यानुसार हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिह्यातून तसेच पुणे जिह्यातील भोर, बारामती, पुरंदर तालुक्यातुन, सांगली जिह्यातील कडेगाव, वाळवा तालुक्यातून सोलापूर जिह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण देवकर, हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, कॉन्स्टेबल केतन शिंदे, महिला कॉन्स्टेबल अनुराधा सणस, शहर पोलीस ठाण्याचे हवालदार दीपक इंगवले, संदीप पवार, अमोल सापते यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.