For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | सातारा नगरपालिकेला ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्यस्तरीय प्रथम क्रमांक

03:35 PM Feb 26, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   सातारा नगरपालिकेला ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्यस्तरीय प्रथम क्रमांक
Advertisement

                               स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि हरित उपक्रमामुळे साताऱ्याची वेगळी ओळख

Advertisement

सातारा - पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सातारा नगरपालिकेने राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात पुणे विभागातून राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल पालिकेला तब्बल ६ कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. शहराच्या स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, हरित उपक्रम आणि पर्यावरणपूरक धोरणांमुळे साताऱ्याची राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

मात्र, एकीकडे राज्यस्तरीय सन्मान मिळत असतानाच दुसरीकडे शहरातील काही नागरिकांच्या बेफिकीर वर्तनामुळे स्वच्छतेच्या प्रयत्नांना गालबोट लागण्याची चिन्हे दिसत आहेत. पहाटेच्या सुमारास घरगुती,हॉटेल व्यववसायिक,फास्ट फूड चालकांकडून कचरा थेट रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. दररोज सकाळी घंटागाडी येत असतानाही तिची वाट न पाहता कचरा उघड्यावर फेकण्यात येत असल्याचे चित्र शहरातील विविध भागांत दिसून येत आहे.

यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असून दुर्गंधी पसरत आहे. विशेषतः भाजीपाला, उरलेले अन्न, प्लास्टिक पिशव्या आणि इतर ओला-सुका कचरा एकत्र टाकला जात असल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. या कचऱ्यावर भटकी जनावरे ताव मारत असून त्यांच्या पोटात प्लास्टिकसह इतर घातक वस्तू जात आहेत. परिणामी जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दररोज अतिरिक्त कष्ट करावे लागत असून, सकाळी साफसफाई केल्यानंतर काही तासांतच पुन्हा कचरा साचत असल्याने त्यांची दमछाक होत आहे.

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेकडून जनजागृती मोहीम, दंडात्मक कारवाई आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख यांसारखे उपाय राबवण्याची गरज असून तेव्हाच सातारकर नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसतील.नागरिकांना 'फायद्या'ची नाही तर 'कायद्या'ची भाषा समजावल्यास शिस्तीचे आणि स्वच्छतेचे महत्व पटणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.