सातारा पालिकेचे स्वच्छतेचे पुढचे पाऊल
सातारा :
सातारा शहर व शहराच्या हद्दीतील एका पथदर्शी झोनसाठी सातारा पालिकेच्यावतीने प्रथमच जे नागरिक सेफ्टींक टँक उपसण्यासाठी मैला गाडी बोलवतील त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारणी करण्यात येणार नाही, असा सातारा पालिकेच्यावतीने महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ही सुविधा पालिकेच्या अर्थसंकल्पाच्या सभेद्वारे उपलब्ध करुन दिली आहे. त्याबाबतची तरतूद केल्याने सातारकरांसाठी महत्वाची सुविधा निर्माण करुन दिली आहे. त्यामुळे सातारा शहर स्वच्छतेच्या दृष्टीने एक पुढचे पाऊलच टाकले गेले आहे.
पुर्वी सातारा नगरपालिकेकडे एकच मैला उपसा करणारी गाडी होती. तीही गाडी अनेकदा नादूरुस्त असायची. त्यामुळे सातारा शहरात खाजगी मैला उपसणाऱ्या गाड्याचे पेव फुटले होते. त्यावेळी पालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी अनेकदा पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले गेले होते. त्यातूनच पुढे सातारा पालिकेने नव्याने मैला उपसा करणाऱ्या गाड्या खरेदी केल्या. त्यामुळे सध्या पालिकेकडे तीन मैला उपसा करणाऱ्या गाड्या सेवेत आहेत. शहरातल्या कुठल्याही नागरिकाने पालिकेकडे मैला उपसा करणाऱ्या गाडीची मागणी केली असता 1 हजार 50 रुपयांची पावती भरुन अर्ज केल्यास लगेच गाडी दिली जाते. आता मात्र, सातारा नगरपालिकेने शहरातील काही पथदर्शी झोनसाठी गाडी मोफत देण्याची सुविधा दि. 3 मार्च 2021 च्या सेफ्ट विद्यापीठ अहमदाबादच्या मार्गदर्शक सुचनेनुसार करण्यात आली आहे. त्याबाबतचा ठराव पालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत मंजुर करण्यात आला आहे. त्याचबरोबर सातारा नगरपालिकेच्या मालकीचा सोनगाव कचरा डेपोत मैला प्रक्रिया प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विशेष अशी तरतूद केली आहे. त्यामुळे सातारकरांसाठी पथदर्शी झोनमध्ये मोफत मैला गाडी 31 मार्चपासून मिळणार आहे.
- मुख्याधिकारी अभिजित बापट यांचे सकारात्मक काम
सातारा शहरातील नागरिकांना स्वच्छतेच्या अनुषंगाने नेमक्या काय तरतूदी करता येतील याचा अभ्यास करुन त्यांनी नुकत्याच मंजूर केलेल्या बजेटमध्ये मैला गाडी पथदर्शी झोनमध्ये फ्री केली आहे तर मैला प्रकल्पाची क्षमता वाढवण्याचाही उपक्रम नमूद केला आहे. हे त्यांच्या सकारात्मक कामाचेही फलित म्हणावे लागेल.