For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Crime | पुण्यातील 'त्या' दुर्घटनेनंतर सातारा जिल्हा अलर्टवर! राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, ३४ जणांना बेड्या

01:42 PM Jun 05, 2026 IST | NEETA POTDAR
satara crime   पुण्यातील  त्या  दुर्घटनेनंतर सातारा जिल्हा अलर्टवर  राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई  ३४ जणांना बेड्या
Advertisement

सातारा : पुणे येथे विषारी दारूमुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू, ताही निर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत २९ मे ते २ जून २०२६ या कालावधीत ४२ गुन्हे नोंदविण्यात आले असून ३४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Advertisement

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे तसेच विभागीय उपआयुक्त, कोल्हापूर विभाग विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार आणि राज्य उत्पादन शुल्क, साताराचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे. विशेष मोहिमेसाठी पाच स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून जिल्हाभर धडक कारवाया करण्यात येत आहेत. मोहिमेदरम्यान ४५१ लिटर हातभट्टी दारू, ८५३ लिटर ताडी तसेच ७१.६४ बल्क लिटर देशी-विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ४८ हजार ७८५रुपये इतकी आहे.

अवैध मार्गाने तयार करण्यात येणारी हातभट्टी दारू, बनावट ताडी व इतर मद्यप्रकार नागरिकांच्या आरोग्यास आणि जीवितास गंभीर घोका निर्माण करू शकतात. राज्यातील काही ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे हा धोका अधोरेखित झाला असल्याने नागरिकांनी अशा अवैध मद्याचे सेवन करू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही विशेष मोहीम पुढील काळातही सुरू राहणार असून अवैध मद्यव्यवसायाविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.