For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : थकबाकी नसताना पीक कर्ज नाकारले?  

06:38 PM Jun 07, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
satara news   थकबाकी नसताना पीक कर्ज नाकारले   
Advertisement
                                सातारा जिल्हा बँकेच्या मार्डी शाखेच्या विकास अधिकाऱ्याविरोधात तक्रार
Advertisement

बाबरहिरे : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्डी शाखेतील विकास अधिकारी राहुल डोईफोडे यांनी कोणतीही थकबाकी नसतानाही पीक कर्ज नाकारल्याचा आरोप करत मार्डी येथील शेतकरी योगेश रामचंद्र पोळ व अर्चना योगेश पोळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारी अर्जानुसार, अर्जदार हे विकास सेवा सोसायटीचे सभासद असून गेल्या १० ते १५ वर्षांपासून नियमितपणे पीक कर्ज घेत आहेत. यंदाही मागील हंगामातील पीक कर्जाची संपूर्ण मुद्दल व व्याजासह रक्कम वेळेत भरलेली असून कोणतीही थकबाकी शिल्लक नाही. या प्रकरणात मुख्य कार्यालयातील आणि विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी येऊन चौकशी आणि तपासणी केली आहे.
लेखापरीक्षणातील अनेक मुद्दे पूर्ण झाल्याशिवाय या प्रकरणात कर्ज वितरण करण्यात येत नाही. त्याची चौकशी सुरू असून लवकरच या प्रकरणात मार्ग निघेल. राहुल डोईफोडे, विकास अधिकारी, माडीं शाखा, सातारा जिल्हा बँक असे असतानाही मार्डी शाखेतील संबंधित विकास अधिकाऱ्यांनी पीक कर्ज मंजूर करण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कर्ज नाकारण्यामागील कारण विचारले असता समाधानकारक उत्तर देण्यात आले नसल्याचे तसेच उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडून पक्षपातीपणे वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी गावातील अनेक नागरिकांकडून होत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
तसेच अर्जदारांशी अरेरावीची भाषा वापरून संवाद साधण्यात आल्याने मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही पोळ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पीक कर्ज अर्जाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, कर्ज नाकारण्याची कारणे लेखी स्वरूपात द्यावीत तसेच संबंधित विकास अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.  
उपोषणाचा इशारा
दरम्यान, या मागण्यांबाबत योग्य निर्णय न झाल्यास शनिवार २० जूनपासून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्डी शाखेसमोर शांततापूर्ण उपोषण आंदोलनाचा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे परिसरातील शेतकरी व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
Advertisement
Tags :

.