सर्वेशचा खून झाल्याचे उघड
मलप्रभा नदीपात्रात सापडला मृतदेह, माळमारुती पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
मारुतीनगर, सांबरा रोड येथील बेपत्ता तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवारी खानापूर तालुक्यातील कोकणवाडीजवळ मलप्रभा नदीपात्रात त्या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. कुटुंबीयांनी माळमारुती पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खुनाच्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
सर्वेश अभिजीत कंग्राळकर (वय 27) राहणार मारुतीनगर, सांबरा रोड असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. रविवार दि. 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास सर्वेशला एक फोन आला. त्यानंतर तो आपल्या दुचाकीवरून गणपती बघण्यासाठी म्हणून घराबाहेर पडला होता. तो घरी परतलाच नाही. म्हणून सोमवारी 21 सप्टेंबर रोजी माळमारुती पोलीस स्थानकात सर्वेश बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास करताना मंडोळी रोडवर एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी झालेल्या तरुणाला कारमध्ये कोंबून एका टोळक्याने तेथून पलायन केल्याची माहिती पोलीस दलाला मिळाली होती. तेव्हापासूनच सर्वत्र शोध घेत असताना शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी सकाळी कोकणवाडीजवळ मलप्रभा नदीपात्रात सर्वेशचा मृतदेह आढळून आला.
त्याचे वडील माजी सैनिक अभिजीत कंग्राळकर यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. एक वर्षापूर्वी कपिलेश्वर मंदिरापाठीमागे असलेल्या शशी जालगार याच्याबरोबर झालेल्या भांडणानंतर सर्वेशने त्याच्यावर चाकू हल्ला केला होता. याचा सूड उगवण्यासाठी शशी व त्याच्या साथीदारांनी सर्वेशचा काटा काढल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर व त्यांचे सहकारी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
बेळगाव ग्रामीण पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
ऐन गणेशोत्सवात झालेल्या या खुनाच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणात बेळगाव ग्रामीण पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मंडोळी रोडवर जेथे खुनाचा प्रकार घडला, त्या परिसरात सर्वेशचे बूट सापडले होते. त्याच्या कुटुंबीयांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात जाऊन यासंबंधी चौकशी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांना व्यवस्थित उत्तरे दिली नव्हती. पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी केली तर बरीच धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे.