सरसंघचालक भागवत अमेरिका दौऱ्यावर दाखल
29 ऑगस्टला मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये कार्यक्रम : न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचा विरोध
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
सरसंघचालक मोहन भागवत मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले. त्यांच्या 17 दिवसांच्या तीन देशांच्या दौऱ्यातील हा पहिला टप्पा आहे. न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळावर भारतीय वंशाच्या महिलांनी तिलक लावून त्यांचे स्वागत केले. अमेरिका भेटीत सरसंघचालक भागवत मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये भारतीयांना संबोधित करतील. त्यांचा हा दौरा आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित जागतिक संपर्क कार्यक्रमाचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. आरएसएसच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त भारत आणि परदेशात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. अमेरिकेनंतर भागवत कॅनडा आणि ब्रिटनला भेट देणार आहेत.
आरएसएसच्या माहितीनुसार, या दौऱ्यात सरसंघचालक भागवत भारतीय वंशाच्या लोकांना आणि स्थानिक संघटनांच्या प्रतिनिधींना भेटतील. भागवत सुरुवातीला 29 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे होणाऱ्या ‘युनिव्हर्सल वननेस’ (सार्वत्रिक एकत्व) कार्यक्रमाला उपस्थित राहतील. न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी भागवत यांच्या या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. ‘मी आरएसएसच्या कार्यक्रमाला पाठिंबा देत नाही. मी त्यांच्या विभाजनवादी विचारसरणीला विरोध करतो.’ असे ममदानी यांनी म्हटले आहे.
अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग फोरमतर्फे मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भागवत या कार्यक्रमाला संबोधित करतील. हा कार्यक्रम रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित केला जात आहे. आयोजकांच्या मते, या कार्यक्रमात रक्षाबंधनाच्या पारंपरिक भावनेसोबतच एकता, नागरिकांची जबाबदारी आणि जागतिक सलोख्याचा संदेश दिला जाईल. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले असून त्यात विविध धर्म व समुदायांचे लोकही सहभागी होतील.