सरपंच रोशन रेडकर, रघुवीर बागकर अटकेच्या भीतीमुळे धावले न्यायालयात
पणजी : ‘बर्च’ क्लब अग्नितांडव संदर्भात हडफडे-नागवेचे निलंबित ग्रामपंचायत सचिव रघुवीर बागकर आणि सरपंच रोशन रेडकर यांना उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जांवर हणजूण पोलिसांना नोटिस बजावली असून त्यावर आज शुक्रवारी सुनावणी होणार आहे. बर्च क्लबच्या संबंधित परवानग्या आणि देखरेखीतील कथित त्रुटींची तपासणी अधिकारी करत असल्याचे समजल्यानंतर या दोघांनी न्यायालयात धाव घेतली. सुनावणीवेळी बागकर आणि रेडकर यांनी दावा केला की त्यांनी अधिकाऱ्यांना तपासकामात पूर्ण सहकार्य केले आहे आणि चौकशीदरम्यान संभाव्य छळ टाळण्यासाठी अटकेपासून संरक्षण मागितले आहे. सरपंच रोशन रेडकर यांनी आग आणि त्यानंतर झालेल्या मृत्यूशी त्यांचा थेट संबंध नाही. सरपंच हे ग्रामपंचायतीचे फक्त प्रमुख असतात, ते परवाने देत नसून मंडळ परवाने देत असल्याचा दावा केला. बांधकाम परवाना पंचायतीने रद्द केला असताना पंचायत उप संचालकांनी त्या आदेशाला स्थगिती दिली असल्याने घटनेला आपण स्वत: जबाबदार नाही. परवाना देणे हे अपघाताशी थेट संबंधित नसल्याचे त्यांनी सांगितले.