Sarpanch Reservation Election 2025: सरपंच आरक्षण सोडतीवरुन जिल्ह्यात कही खुशी, कही गम
गावातील सर्व प्रवर्गातील नागरिकांना विचारात घेऊन आरक्षण काढले पाहिजे
कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी काढण्यात आली. या आरक्षण सोडतीमुळे इच्छुकांना काही ठिकाणी फटका बसला तर मनाजोगी सोडत झाल्यामुळे अनेक इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. चुकीच्या आरक्षणाबद्दल अनेकांनी थेट तहसीलदार यांच्यासमोरच सोडतीविरोधात लढा देणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात दिवसभर कही खुशी, कही गम असे वातावरण होते.
अनेक नागरिकांनी आरक्षणात कोणताही बदल न केल्याच्या तक्रारी केल्या. काही ठिकाणी पुरूष ऐवजी स्त्री आणि स्त्री ऐवजी पुरूष इतकाच बदल केला असल्याचे अनेकांनी सांगितले. तर काहींनी लोकसंख्येनुसार आरक्षणाच्या सोडती करणे चुकीचे असल्याचे सांगितले. मागासवर्गीयांना डावलले असल्याच्या तक्रारीही अनेकांनी केल्या.
गावातील सर्व प्रवर्गातील नागरिकांना विचारात घेऊन आरक्षण काढले पाहिजे, अशा सूचनाही अनेकांनी तहसीलदार यांना केल्या. जिह्यातील एक हजार 26 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी तिसऱ्यांदा सोडत काढण्यात आली. यापूर्वीच्या सोडतीमध्ये आरक्षण न मिळाल्यामुळे नाराज झालेल्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. याबरोबर गतवेळचे आरक्षण मिळालेल्यांमध्ये धाकधूक होती.
सरपंच आरक्षण सोडतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या सोडतीत जिल्ह्यात खुल्या प्रवर्गासाठी एकूण ६०४ सरपंचपदाचे आरक्षण काढले. त्यातील ३०२ महिलांकरिता राखीव, अनुसूचित जातीसाठी १३८ जागा, त्यातील महिलांसाठी ६९ जागा राखीव, अनुसूचित जमातीसाठी ७ जागा राखीव राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यातील ४ महिलांसाठी आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या २७७ जागा सरपंचपदासाठी राखीव तर त्यातील १३९ जागा या महिलांकरिता राखीव जाहीर करण्यात आल्या.