शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील सरपंच, उपसरपंचाचे मानधन वाढवावे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार चंद्रदीप नरके यांची मागणी
कोल्हापूर
राज्यातील सरपंच व उपसरपंच वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत असून शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे त्यांचे मानधन त्वरित वाढवावे अशी मागणी करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनातील मजकूर असा की गेल्या काही महिन्यांपूर्वी शासनाच्यावतीने सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली होती, परंतु पुढे कार्यवाही झालेली नाही. कित्येक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित असणारा सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्कालीन शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या २३ सप्टेंबर २०२४ च्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला. मात्र, अद्यापपर्यंत सरपंच व उपसरपंचांना वाढीव मानधन प्राप्त झालेले नाही. नवीन वर्षात तरी प्रशासनाकडून सरपंच, उपसरपंच यांना वाढीव मानधन मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्यात यावी यासाठी सरपंच संघटनांनी संघर्ष केला.शासन दरबारी हा विषय लावून धरल्याने त्यामध्ये शासनाने दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या २ हजारांपर्यंत आहे, त्या सरपंचाचे मानधन ३ वरून ६ हजार तर उपसरपंचाचे मानधन हे १ वरून २ हजार करण्याचा निर्णय झाला आहे. ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या २ ते ८ हजारांदरम्यान आहे, त्या सरपंचाचे मानधन ४ वरून ८ हजार तर उपसरपंचाचे मानधन १५०० वरून ३ हजार रुपये इतके करण्याचा निर्णय झाला आहे.ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ८००० पेक्षा जास्त आहे, त्या सरपंचाचे मानधन ५ वरून १० हजार, तर उपसरपंचाचे मानधन २ वरून ४ हजार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
मानधनासाठी ७५ टक्के निधी शासनाकडून आणि २५ टक्के निधी संबंधित ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून दिला जातो. मात्र, वाढीव मानधनाचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला नसल्याने सरपंच व उपसरपंच वाढीव मानधनापासून वंचित आहेत. त्यामुळे वाढीव मानधनापोटी शासनाकडून निधी केव्हा उपलब्ध होणार, याबाबतची सरपंच व उपसरपंच यांना प्रतीक्षा आहे. सरपंच संघटना, विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी वाढीव मानधनाचा मोठा जल्लोष साजरा केला होता. परंतु निधी उपलब्ध नसल्याने त्यांची निराशा झाली आहे. तरी राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन वाढीबाबत घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करणेबाबत संबंधितांना उचित आदेश व्हावेत अशी मागणी आमदार नरके यांनी केली आहे.