इराणी कपमध्ये सरफराजचा द्विशतकी धमाका
स्पर्धेत द्विशतक करणारा मुंबईचा पहिलाच खेळाडू : रहाणेचे शतक हुकले तर तनुष कोटियनची अर्धशतकी खेळी
वृत्तसंस्था/ लखनौ
येथील एकाना स्टेडियमवर सुरु असलेल्या इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेत शेष भारतविरुद्ध मुंबईने 536 धावांचा डोंगर उभा केला आहे. 26 वर्षीय स्टार फलंदाज सरफराज खानच्या शानदार द्विशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने दुसऱ्या दिवसअखेरीस 9 बाद 536 धावा केल्या आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा सरफराज 221 व मोहम्मद खान 0 धावांवर खेळत होते. विशेष म्हणजे, या वर्षी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतून भारतासाठी पदार्पण करणाऱ्या सरफराजला बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत बेंचवर बसावे लागलं होते. या मालिकेसाठी विराट कोहली, रिषभ पंत आणि केएल राहुलच्या पुनरागमनामुळे त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही, मात्र आता न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी सरफराजने द्विशतक ठोकून निवडकर्त्यांची डोकेदुखी वाढवली आहे.
मंगळवारी शेष भारताचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवशी 4 बाद 237 धावा केल्या होत्या. याच धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरुवात केली. कर्णधार अजिंक्य रहाणे व सरफराज खान यांनी संघाच्या डावाला आकार देताना पाचव्या गड्यासाठी 131 धावांची भागीदारी केली. ही जोडी जमलेली असताना रहाणेला यश दयालने बाद केले. रहाणेचे शतक तीन धावांनी हुकले. रहाणे 234 चेंडूत 97 धावा केल्या. रहाणेनंतर आलेला शम्स मुलानीही स्वस्तात परतला.
सरफराजचे नाबाद द्विशतक
रहाणे व शम्स मुलानी या दोन विकेट लागोपाठ गेल्यानंतर सरफराजने तनुष कोटियानसोबत संघाला सावरले. या जोडीने शेष भारताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना 183 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. सरफराज डावाच्या सुरुवातीपासूनच चांगल्या लयीत होता आणि कोणतीही जोखीम न घेता त्याने अवघ्या 150 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने कर्णधार अजिंक्य रहाणे व तनुष कोटियानसोबत उत्कृष्ट भागीदारी रचली, ज्यामुळे मुंबई संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यात तो यशस्वी ठरला. त्याने अवघ्या 253 चेंडूत 200 धावा पूर्ण केल्या आणि यादरम्यान त्याने 23 चौकार आणि तीन षटकार लगावले. त्याच्यामुळेच मुंबईचा संघ मोठी धावसंख्या गाठण्यात यशस्वी ठरला आहे. तनुषने त्याला चांगली साथ देताना 6 चौकारासह 64 धावांचे योगदान दिले. तनुष बाद झाल्यानंतर सरफराजने शार्दुलसोबत संघाला 525 धावापर्यंत मजल मारुन दिली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यास एक षटक बाकी असताना शार्दुल 36 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. दिवसअखेरीस मुंबईने 138 षटकांत 9 बाद 536 धावा केल्या होत्या. सरफराज 276 चेंडूत 25 चौकार व 4 षटकारासह 221 धावांवर खेळत होता.
संक्षिप्त धावफलक
मुंबई पहिला डाव 138 षटकांत 9 बाद 536 (पृथ्वी शॉ 4, रहाणे 97, श्रेयस अय्यर 57, सरफराज खान नाबाद 221, तनुष कोटियन 64, शार्दुल 36, मुकेश कुमार 4 बळी, यश दयाल व प्रसिद्ध कृष्णा प्रत्येकी 2 बळी).
इराणी करंडक स्पर्धेत द्विशतक करणारा पहिलाच मुंबईकर
मुंबईकर फलंदाज सरफराज खानने इराणी कप स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रात रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध ऐतिहासिक द्विशतक झळकावले. सरफराजने या द्विशतकी खेळी दरम्यान इतिहास रचला आहे. इराणी कप स्पर्धेच्या इतिहासात द्विशतक करणारा पहिलाच मुंबईकर फलंदाज ठरला आहे. यापूर्वी या स्पर्धेत मुंबईकडून कोणत्याच खेळाडूला द्विशतक करता आलेले नाही. यामुळे सरफराजसाठी हे द्विशतक ऐतिहासिक असे ठरले आहे. याशिवाय, इराणी चषक स्पर्धेत मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी, रामनाथ पारकर यांनी मुंबईकडून इराणी कपमध्ये 1972 साली नाबाद 194 धावांची खेळी केली होती.
इराणी कपमध्ये मुंबईकर फलंदाजांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
सरफराज खान - नाबाद 221 (2024)
रामनाथ पारकर - 194 (1972)
अजिंक्य रहाणे - 191 (2010)
भन्नाट सेलिब्रेशन
सरफराज खान हा इराणी ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरला पण अपघातामुळे त्याचा भाऊ मुशीर खान या सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. पण सरफराजने मात्र यावेळी तुफानी फटकेबाजी केली. सुरुवातीला दमदार शतक झळकावले, नंतर आक्रमक खेळत द्विशतक साजरे केले. द्विशतकानंतर त्याने भन्नाट सेलिब्रेशन केले. यावेळी हेल्मेट काढले आणि त्यानंतर दोन्ही हात उंचावत त्याने अभिवादन स्विकारले. यानंतर तो दोन्ही पायांवर बसला आणि आपल्या जवळील ताबीझला किस केले.