सरदार्स हायस्कूल, येळ्ळूर मराठी प्राथ.शाळा पब्लिक स्कूल
राज्यातील 700 शाळांचा दर्जा वाढविला : बेळगाव जिल्ह्यातील 46 सरकारी शाळांचा समावेश
बेंगळूर : राज्य सरकारने बुधवारी आणखी 700 कर्नाटक पब्लिक स्कूलची (केपीएस) घोषणा केली आहे. यात बेळगाव जिल्ह्यातील 47 सरकारी शाळांचा समावेश आहे. काकतीवेस येथील सरदार्स हायस्कूल आणि येळ्ळूरमधील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेला पब्लिक स्कूल म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे येथे दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थी पटसंख्या वाढीसाठी आवश्यक सुविधा पुरविल्या जाणार आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 23 आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 24 शाळांना पब्लिक स्कूलचा दर्जा देण्यात आला आहे. बेळगाव शहरात खंजर गल्ली येथील सरकारी उर्दु माध्यमिक शाळा क्र. 1, कणबर्गी येथील कन्नड उच्च प्राथमिक शाळा आणि काकतीवेस येथील सरदार्स हायस्कूलला पब्लिक स्कूल म्हणून दर्जा देण्यात आला आहे. या अनुषंगाने एकाच ठिकाणी पूर्व प्राथमिकपासून पदवीपूर्व शिक्षण देण्याची सोय होणार आहे.
बेळगाव तालुक्यात नवे वंटमुरी, सुळेभावी, मास्तमर्डी, अंकलगी, मच्छे येथील सरकारी कन्नड उच्च प्राथमिक शाळा तसेच येळ्ळूर येथील मराठी उच्च प्राथमिक शाळांना पब्लिक स्कूलचा दर्जा देण्यात आला आहे. खानापूर तालुक्यात खानापूरमधील कन्नड उच्च प्राथमिक शाळा आणि गुंजी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळा व माध्यमिक शाळेचाही यात समावेश आहे. या शाळांना आवश्यक अनुदान व सुविधा पुरविण्यासंबंधी निर्देश देण्यात आले आहेत. अलीकडे सरकारी शाळांमधील प्रवेश संख्येत 19 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 2025-26 या वर्षात 50 किंवा त्यापेक्षा कमी प्रवेश नोंद झालेल्या शाळांचा आकडा 25,683 इतका आहे. शाळाबाह्या मुलांचे प्रमाणही वाढले आहे. ही बाब विचारात घेऊन दर्जेदार शिक्षण आणि पटसंख्या वाढविण्याच्या उद्देशाने कर्नाटक पब्लिक स्कूलचा पर्याय शोधला आहे. यंदा कल्याण कर्नाटक भागातील 7 जिल्ह्यांत 200 आणि इतर जिल्ह्यांत 500 शाळांना पब्लिक स्कूलचा दर्जा दिला आहे. 2018-19 या शैक्षणिक वर्षात राज्यभरात 176 पब्लिक स्कूल घोषित करण्यात आल्या होत्या. नंतर हा आकडा 309 पर्यंत गेला. प्रत्येक शाळेत पायाभूत सुविधा, शैक्षणिक सामग्रीसाठी 2 कोटी ते 4 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.