सरदार सरोवर जवळजवळ पूर्ण भरले
वृत्तसंस्था / राजपिपला
भारतातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेले गुजरातमधील सरदार सरोवर जवळपास पूर्ण भरले आहे. ते पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ 2 मीटर उंचीच्या पाण्याची आवश्यकता असून येत्या तीन ते चार दिवसांमध्ये ती आवश्यकता पूर्ण होईल, असे या धरणाच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
यंदा या धरणातून विसर्गही मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असून तो 3.5 लाख क्यूसेक्स इतका आहे. त्यामुळे धरण्याच्या खालच्या अंगाला असणाऱ्या भडोच जिल्ह्यातील नर्मदा नदीतीरावरील खेड्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदा मध्यप्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. हे धरण नर्मदा नदीवर बांधण्यात आले आहे. या धरणामुळे दूरवर असणाऱ्या कच्छ या कमी पाण्याच्या प्रदेशातील पाणीटंचाई दूर होणार आहे. या धरणापासून कच्छपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे कामही जवळपास पूर्ण होत आले आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थान या चारही राज्यांना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्यासाठीही हे धरण उपयुक्त आहे.