सरदार पटेल यांना हवे होते पूर्ण काश्मीर
नेहरुंनी घातला खोडा : पंतप्रधान मोदी यांची व्यथा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रीय एकात्मता दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऱ्या देशाची एक व्यथा पुन्हा समोर आणली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारताने त्याला संधी असूनही संपूर्ण काश्मीर भारतात समाविष्ट करून न घेतल्याने, भारताची किती हानी झाली, हे त्यांनी या दिनाचे निमित्त साधून भारतीयांच्या दृष्टीसमोर आणले आहे. तसेच भारताच्या भौगोलिक एकात्मतेचे ‘शिल्पकार’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे किती दूरदृष्टी होती, हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
सरदार पटेल यांनी काश्मीरचे जागतिक भौगोलिक महत्त्व जाणले. त्यामुळे त्यांना संपूर्ण काश्मीर भारतात समाविष्ट करून घ्यायचे होते. ज्याप्रमाणे त्यांनी इतर सर्व संस्थांनांचे विलिनीकरण भारतात केले, तसेच त्यांना संपूर्ण काश्मीरसंबंधी करायचे होते. तथापि, त्यावेळचे नेते जवाहरलाल नेहरु यांनी पटेल यांच्या प्रयत्नांमध्ये खोडा घातला. परिणामी, त्याचवेळी संधी असतानाही संपूर्ण काश्मीर भारताचे होऊ शकले नाही, ही साऱ्या देशाची व्यथा त्यांनी बोलून दाखविली.
सरदार पटेलांना अभिवादन
शुक्रवारी राष्ट्रीय एकात्मता दिनी गुजरातमधील एकता नगर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी झाले होते. त्यांनी एकता नगर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. या कार्यक्रमात भव्य संचलनाचेही आयोजन करण्यात आले होते. या पथसंचलनात सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, भारत-तिबेटियन सीमा पोलीस, सशस्त्र सीमा दल आणि स्थानिक पोलीस दल यांचा समावेश होता.
काश्मीरप्रश्नी काय घडले होते...
1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतरही काश्मीरच्या संस्थानाचा प्रश्न लोंबकळत पडला होता. या संस्थानाचे राजे हरीसिंग यांनी संपूर्ण काश्मीर भारतात समाविष्ट करण्याची इच्छा स्वातंत्र्याआधीच व्यक्त केली होती. तथापि, नेहरु आणि इतर नेत्यांनी हा प्रश्न जनतेची इच्छा लक्षात घेऊन सोडवावा अशी भूमिका घेतली. इतर संस्थानांच्या जनतेला मात्र तिचे मत विचारण्यात आले नव्हते. सार्वमत न घेताच इतर संस्थाने भारतात विलीन करण्यात आली. पण केवळ काश्मीरचा अपवाद करण्यात आला. त्यामुळे काश्मीर भारताच्या स्वातंत्र्यानंतरही स्वतंत्रच राहिले. पाकिस्तानने या संधीला लाभ उठवत काश्मीरमध्ये आपले सैनिक आणि दहशतवादी घुसवून हे संपूर्ण संस्थान बळकाविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारताने काश्मीरमध्ये सेना पाठवून पाकिस्तानला रोखण्याचा निर्णय घेतला. भारतीय सेनेने पराक्रमाची शर्थ करत पाकिस्तानचे दहशतवादी आणि सैनिक यांना हुसकावून लावले होते. तथापि, भारतीय सेना जिंकत असतानाही नेहरु आणि माऊंटबॅटन यांनी भारतीय सेनेला माघारी बोलाविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतासाठी आजही अत्यंत घातक ठरत आहे. कारण त्यामुळे काश्मीरचा संपूर्ण उत्तर भाग पाकिस्तानच्या हाती गेला. हा उत्तर भाग आज भारताच्या हाती असता, तर भारताचा अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अन्य तीन देशांशी भूमीसंपर्क राहिला असता. तसेच चीन आणि पाकिस्तान यांच्यातील भूसंपर्क तुटला असता. या दोन्हींचा भारताला जागतिक राजकारणात प्रचंड लाभ झाला असता. पण त्यावेळी दाखविण्यात आलेल्या घातक अतिऔदार्यामुळे भारताची ही संधी हुकली. त्यामुळे मध्य आशिया आणि अफगाणिस्तान या भूराजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या प्रदेशांमध्ये आपली भूमिका साकारण्याची भारताची संधीही हुकली. तसेच चीन आणि पाकिस्तान यांची भूसीमा जोडली गेल्याने पाकिस्तानचा मोठा लाभ झाला. त्यावेळी करण्यात आलेल्या या घोडचुकीची किंमत आजही भारताला भोगावी लागत असून हीच व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.