दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार सारा अर्जुन
धनुषसोबत काम करण्याची संधी
सारा अर्जुन हिने धुरंधर चित्रपटाद्वारे देशभरात स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सारा सध्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. याचदरम्यान सारा आता राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता धनुषसोबत झळकणार आहे. एका दाक्षिणात्य चित्रपटात तिची वर्णी लागली असून याचे दिग्दर्शन तमिलरासन पचामुथु करणार आहेत.
धनुषकडे दिग्दर्शक तमिलरासन पचामुथुसोबतचा एक प्रोजेक्ट आहे. या चित्रपटात मुख्य नायिका म्हणून रुक्मिणी वसंतची निवड करण्यात आली होती. परंतु रुक्मिणी वसंत अन्य एका प्रोजेक्टमध्ये व्यग्र असल्याने तिला यातून वगळण्यात आले आहे. रुक्मिणी ही एनटीआर आणि प्रशांत नील यांच्या चित्रपटासाठी सध्या काम करत आहे. अशास्थितीत चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता मुख्य अभिनेत्री म्हणून सारा अर्जुनची निवड केली आहे.
अभिनेता धनुषने स्वत:च्या आगामी चित्रपटाची घोषणा केली असून तूर्तास याचे नाव ‘डी55’ ठेवण्यात आले आहे. याचबरोबर धनुष हा ‘कारा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत ममिता बैजू झळकणार आहे. तर सारा सध्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटाच्या भरघोस यशाचा आनंद घेत आहे.