‘मिसेज’मधील भूमिकेमुळे सान्या चर्चेत
स्क्रीनिंगसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार
बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या स्वत:चा चित्रपट ‘मिसेज’वरून चर्चेत आहे. स्वत:च्या अनेक चित्रपटांद्वारे लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारी सान्या अभिनयासोबत नृत्यासाठी देखील ओळखली जाते. सान्या आता स्वत:चा चित्रपट ‘मिसेज’च्या स्क्रीनिंगसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. या चित्रपटाचा प्रीमियर मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये होणार आहे.
मिसेज हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित मल्याळी चित्रपट ‘द ग्रेट इंडियन किचेन’चा हिंदी रिमेक आहे. चित्रपट एका नृत्यांगनाच्या जीवनावर आधारित होता, जिचा विवाह खुले विचारांची पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबात झालेला असतो. त्या घरात काम करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जातो. अखेरीस ती हा दबाव झुगारून लावते.
या चित्रपटात सान्यासोबत कंवलजीत सिंह आणि निशांत दहिया देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती ज्योति देशपांडे, पम्मी बावेजा आणि हरमन बावेजा यांनी केली आहे. अभिनेत्री सान्याने मिसेज या चित्रपटासाठी न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे. इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न 15-25 ऑगस्ट या कालावधीत आयोजित होणार आहे.