अन्यथा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालू
शिंदे शिवसेनेच्या संतोष गोवेकर यांचा इशारा
सातार्डा -
सातार्डा पंचक्रोशीमध्ये रात्रीच्यावेळी, पहाटे रेडी व मळेवाड येथून वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांसह घेराव घालण्याचा इशारा शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख व शिंदे सेनेचे कार्यकर्ते संतोष गोवेकर यांनी दिला आहे. पंचक्रोशीत रोज रात्रीच्यावेळी, पहाटे, महावितरणच्या रेडी येथील विद्युत केंद्र व मळेवाड येथील वीज उपकेंद्रातून हेतुपुरस्सर विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे.रात्रीच्यावेळी, पहाटेच्यावेळी विद्युत पुरवठा खंडित होतो. तासाभराने पुन्हा सुरु होतो. महावितरणचे कर्मचारी रात्री, पहाटे कार्यरत असतात काय असा प्रश्न श्री गोवेकर यांनी उपस्थित केला आहे.मळेवाड, रेडी विद्युत केंद्रातून सातार्डा पंचक्रोशीतील वीज पुरवठा खंडित ठेऊन इतर ठिकाणी सुरु केला जातो असा आरोप श्री गोवेकर यांनी केला आहे.रात्री, पहाटे वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने कामाला जाणाऱ्यांचे,गृहिणीचे,मुलांचे हाल होत आहेत. खंडित वीज पुरवठ्यासंदर्भात जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांची महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून दिशाभूल केली जात आहे. पंचक्रोशीतील विद्युत पुरवठा रात्री व पहाटे सुरळीतपणे सुरु ठेवावा अन्यथा महावितरणच्या रेडी व मळेवाडच्या अभियंत्यांना घेराव घालण्याचा इशारा शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष गोवेकर यांनी दिला आहे.