संतिबस्तवाड उपआरोग्य केंद्र दोन वर्षांपासून बंदच
रुग्णांची गैरसोय : संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष : नागरिकांना घ्यावा लागतोय खासगी दवाखान्यांचा आधार
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील संतिबस्तवाड येथील उपआरोग्य केंद्राची इमारत गेल्या दोन वर्षांपासून ओसाड पडली आहे. या इमारतीच्या आजूबाजूला गवत व झाडे-झुडपे वाढलेली आहेत. दवाखान्याची संरक्षक भिंत कोसळलेली आहे. इमारतीला भेगा पडलेल्या आहेत. उपआरोग्य केंद्र बंद असल्यामुळे नागरिकांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे याकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने सरकारने आरोग्य केंद्रे निर्माण केली आहेत. या आरोग्य केंद्रांमध्ये गोरगरीब व होतकरू लोकांना मोफत उपचार व औषधे दिली जातात. याचा काही गावांमध्ये फायदाही होतो आणि लोक या ठिकाणी येऊन तपासणी करून उपचारही करून घेतात. मात्र संतिबस्तवाड गावात असलेले उपआरोग्य केंद्र सध्या बंद अवस्थेत आहे. या आरोग्य केंद्राकडे लक्ष देणार कोण? असा सवाल नागरिक करू लागले आहेत.
संतिबस्तवाड गावातील नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. या गावातील उपआरोग्य केंद्राची इमारत पूर्णपणे खराब झाली असून त्या इमारतीला गळती लागली आहे. तसेच दरवाजे मोडलेल्या अवस्थेत आहेत. गेल्या दोन वर्षापासून हे आरोग्य केंद्र बंद आहे. त्यामुळे या गावातील उपआरोग्य केंद्रच आजारी पडले आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गावात सुमारे 7000 लोकवस्ती आहे. ग्रामपंचायतीच्या जवळच उपआरोग्य केंद्राची इमारत आहे. मात्र या आरोग्य केंद्रातून नागरिकांना आरोग्य संबंधित सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे सर्वजण वैतागले आहेत.
सध्या हे आरोग्य केंद्र बंद अवस्थेत आहे
पावसाळ्यात या उपआरोग्य केंद्राला पूर्णपणे गळती लागलेली होती. याचबरोबर शौचालयही व्यवस्थित नाही. दरवाजे व खिडक्मयांना वाळवी लागली असून ती पूर्णपणे खराब झालेली आहेत. फरशीच्या ठिकाणी घुशी व उंदीर लागलेले आहेत. या आरोग्य केंद्राची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळेच हे उपआरोग्य केंद्र बंद आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
खासगी खोलीत करताहेत उपचार...
आरोग्य केंद्रात येणाऱ्या आरोग्याधिकारी व नर्स यांनी गावातील मुख्य रस्त्याच्या बाजूला एक खासगी खोली घेतलेली आहे. त्या ठिकाणी सध्या रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. मात्र गावातून नागरिकांना या ठिकाणी ये जा करण्यासाठी अंतर मोजावे लागत आहे. उपआरोग्य केंद्राच्या इमारती संदर्भात ग्रामपंचायतीनेही आवाज उठवण्याची गरज आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
वृद्ध व्यक्तींचे हाल,प्रशासनाचे दुर्लक्ष
नर्स व डॉक्टर गावातील एका खासगी इमारतीत केवळ दिवसा ऊग्णांची तपासणी करून औषधोपचार करतात. मात्र रात्रीच्या वेळी इथे उपचार होत नाहीत. रात्रीच्या वेळी रुग्णाला थेट बेळगाव किंवा खासगी दवाखान्याला घेऊन जावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. उपआरोग्य केंद्र गावापासून लांब असल्यामुळे वयोवृद्धांना या ठिकाणी ये-जा करणे कठीण बनले आहे. सरकारी व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीची पाहणी करावी व त्वरित इमारतीसाठी निधी मंजूर करून सुसज्ज इमारत बांधावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
- भरमा गुडुमकेरी, संतिबस्तवाड
