सरवडेत साजरा होणार जिल्ह्याचा संत तुकाराम वैकुंठ गमन सोहळा...
वारकरी संप्रदायाकडून आयोजन : आठ दिवस चालणार धार्मिक कार्यक्रम
सरवडे प्रतिनिधी
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तरी अमृतमहोत्सवी वैकुंठ गमन सोहळा कोल्हापूर जिह्यात एकाच ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. आठ दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यासाठी राधानगरी तालुक्यातील सरवडे गावाची निवड केल्याची घोषणा रामायणचार्य ह.भ.प. रोहित सावंत महाराज (आळंदी)यांनी केली.
सरवडे येथे जिह्यातील वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित बैठकीत सावंत महाराज यांनी सरवडेची घोषणा करून श्रीफळ दिले. सोहळ्याची तारीख नियोजनानंतर जाहीर करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी रोज सुमारे पाच हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे. त्यादृष्टीने मंडप उभारणी, भोजन कक्ष व वाहन पार्किंग व्यवस्था करावी लागणार आहे. आठ दिवस रोज काकड आरती, गाथा पारायण, भजन तसेच महाराष्ट्रातील नामवंतांची प्रवचने, कीर्तने होणार आहेत. यासाठी जिह्यातील संस्था, व्यक्तींची मदत घेतली जाणार आहे.
बाळासाहेब कदम यांनी स्वागत केले. कोल्हापूर जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष शिवाजीराव वागवेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रोहित सावंत यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. ज्येष्ठ कीर्तनकार बाबुराव पाटील सावर्डे, डॉ. शिवाजी पन्हाळकर उत्तूर, मारुती भोसले, जोगेवाडी, उदय शास्त्राr शेळेवाडी, शिवाजी सूर्यवंशी नरतवडे, अशोक कौलवकर गारगोटी, दत्तात्रय सावंत शिंदेवाडी, मारुती पाटील उंदरवाडी, रामराव देसाई कडगाव, नारायण माळी बस्तवडे यांची भाषणे झाली. मानसिंग किल्लेदार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जे. के. पाटील यांनी आभार मानले.
सरवडेची निवड
संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनास 375 वर्षे झाली. त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात त्रिशतकोत्तरी वैकुंठ गमन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक जिह्यात एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी मनुष्यबळ व नियोजनाची आवश्यकता आहे. कोल्हापूर जिह्यात सरवडेची निवड केली आहे. यापूर्वी या गावात अनेक सांप्रदायिक कार्यक्रम पार पडले आहेत. हजारोंच्या उपस्थितीत चालणारा हा सोहळा यशस्वी व्हावा, यासाठी या गावाची निवड करण्यात आली आहे.