Vari Pandharichi 2025: तुकोबांची पालखी सोलापूर जिल्ह्यात, जिल्हाधिकाऱ्यांनी केले रथाचे सारथ्य
हरिनामाचा गजर करीत सर्व वारकरी भक्तीरसात न्हाऊन निघाले
अकलूज : चला पंढरीसी जावू, बाप रखुमा देविवरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी... असा हरिनामाचा गजर करीत सर्व वारकरी भक्तीरसात न्हाऊन निघाले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी स्वागतासाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, उपविभागीय अधिकारी अमित माळी, विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुल, मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते.
नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी 8.35 वाजता अकलूज येथे आगमन झाले. यावेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली तर पोलिसांच्या बँड पथकानेही पालखीचे स्वागत केले. पालखी स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास निरोप देण्यात आला. तसेच पुणे जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे पालखीची भक्तिभावाने देवाण-घेवाण करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी केले रथाचे सारथ्य
स्वागत ठिकाणापासून पालखीच्या रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगमही उपस्थित होते. पालखी स्वागत सोहळ्यापूर्वी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पालखी मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या हिरकणी कक्ष, वैद्यकीय सेवा कक्ष, आरोग्य केंद्रास भेट देऊन आरोग्य सेवेची माहिती घेतली.