Vari Pandharichi 2025: नेणो ब्रह्म मार्ग चुकले। उघडे पंढरपुरा आले। तो हा विठोबा निधान
देवाचे जे अवतार प्रसिद्ध आहेत त्यापैकी श्रीकृष्ण हा पूर्ण अवतार
By : ह.भ.प. अभय जगताप, सासवड
नेणो ब्रह्म मार्ग चुकले ।
उघडे पंढरपुरा आले ।
भक्त पुंडलिके देखिले ।
उभे केले विटेवरी।।1।।
तो हा विठोबा निधान ।
ज्याचे ब्रह्मादिका ध्यान ।
पाउलें समान ।
विटेवरी शोभती ।।2।।
रुप पाहतां तरी डोळसु ।
सुंदर पाहता गोपवेषु ।
महिमा वर्णिता महेशु ।
जेणें मस्तकीं वंदिला ।।3।।
भक्ति देखोनी लांचावला ।
जाऊं नेदि उभा केला ।
निवृतिदास म्हणे विठ्ठला।
जन्मोजन्मी न विसंबे।।4।।
- संत ज्ञानेश्वर महाराज
सासवड : आज जेष्ठ वद्य अष्टमी. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. पंढरपूरला येणाऱ्या पालखी सोहळ्यात सर्वात अधिक गर्दीची पालखी म्हणजे माऊलींची पालखी. माऊलींनी या अभंगांमध्ये पांडुरंगाचा महिमा सांगताना त्याची पंढरपूरला येण्याची कथा सांगितली आहे. हे सांगताना त्यांनी थोडी गंमत केली आहे. देवाचे जे अवतार प्रसिद्ध आहेत त्यापैकी श्रीकृष्ण हा पूर्ण अवतार.
परब्रह्मच श्रीकृष्ण रूपाने प्रगट झाले. पुंडलिकाच्या भक्तीवर, मातापित्यांच्या सेवेवर प्रसन्न होऊन हा श्रीकृष्ण पंढरपूरला आला व पांडुरंग म्हणून प्रसिद्ध झाला. आरतीमधे नामदेवरायांनीही ‘पुंडलिका भेटी परब्रम्ह आले गा’ असा देवाचा परब्रह्म म्हणून उल्लेख केला आहे.
‘पुंडलिकाच्या भावार्था।
गोकुळाहुनी झाला येता’
असे एका दुसऱ्या अभंगात माऊलींनीच म्हटले आहे. तर हा परब्रह्म श्रीकृष्ण पंढरपूरला आला हे जरा वेगळ्या पद्धतीने सांगताना माऊली म्हणतात- ‘हे उघडे परब्रम्ह वाट चुकून पंढरपूरला आले.’ परब्रम्ह उघडे आहे म्हणजे प्रत्यक्ष आहे. त्यावर कोणतेही दुसरे आवरण अथवा पडदा नाही. चुकून येथे आलेल्या देवाला पुंडलिकाने पाहिले आणि विटेवर उभे केले. विठोबाला माउलींनी निधान म्हटले आहे.
निधान म्हणजे भांडार आश्रय, आधार, ठेवा. हा विठोबा सुखाचा, भक्तीचा, ज्ञानाचा, प्रेमाचा निधान आहे. ब्रह्मदेव वगैरे देव सुद्धा या परब्रम्हाचे ध्यान करत असतात. त्याचे खरे रूप- परब्रह्मत्व हे डोळस भक्तांना कळते. त्याने गोपवेश धारण केला आहे. भगवान शंकर सुद्धा त्याचा महिमा वर्णन करतात. असे हे परब्रम्ह पुंडलिकाची भक्ती बघून लाचावले, मोहीत झाले.
मग पुंडलिकानेही त्याला येथून जावू न देता विटेवर उभे केले. थोडक्यात अत्यंत दुर्लभ असलेला हा परमात्मा पुंडलिकाच्या भक्तीमुळे आपल्याला सहज साध्य झाला आहे. अशा ह्या विठ्ठलाला मी जन्मोजन्मी विसंबणार नाही असे माऊली म्हणतात. येथे माऊलींनी स्वत:चा उल्लेख ‘निवृत्तीदास’ - गुरु आणि जेष्ठ बंधू असलेल्या निवृत्तीनाथांचे दास असा केला आहे.