Vari Pandhrichi 2025: जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंदे केशवा भेटताचि।।
आपापल्या परीने परमात्म्याचा शोध घेत होते
मीरा उत्पात :
ताशी : ज्ञानेश्वर माउलींनी भागवत धर्माची स्थापना करून अठरापगड जातींना वारकरी पंथात सामावून घेतले. त्याकाळी ही फार मोठी क्रांती होती. सारेजण विठ्ठल भक्तीत रममाण झाले होते. आणि आपापल्या परीने परमात्म्याचा शोध घेत होते. शिंपी, माळी, नाभिक असे अनेक जातीजमातींचे भगवद् भक्त ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीत सामील झाले.
त्यातील एक ठळक नाव म्हणजे, संत सेना महाराज! सेना महाराजांचा जन्म नाभिक घराण्यात झाला. त्यांचे वडील देविदास राजाच्या पदरी केस दाढी करणे, अंग मर्दन करणे, अशी कामे राज सेवा म्हणून करत होते. ते अतिशय सात्त्विक होते. ईश्वर भक्त होते. त्यामुळे राजा त्यांच्याबरोबर धार्मिक विषयांवर चर्चा करत असे.
तेच संस्कार सेना महाराजांवर झाले. देविदास हे विठ्ठलाचे भक्त होते. त्यांचे पंढरपूरला जाऊन विठ्ठल दर्शन घेण्याचे स्वप्न प्रकृती अस्वास्थ्यामुळे राहिले. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सेना महाराज बांधवगडहून पंढरपुरात आले. सेना महाराजांना विठ्ठलाची गोडी लागली.
ज्ञानेश्वर, नामदेव महाराजांच्या वारकरी संप्रदायात ते सामील झाले. आपल्या व्यवसायातील प्रतिमा वापरून संतांनी अभंगरचना केल्या आहेत. त्याप्रमाणे सेना महाराजांनी सुद्धा नाभिकाच्या व्यवसायाची रूपके वापरून
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।। विवेक दर्पण आयना दावू । वैराग्य चिमटा हलवू ।। उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।। चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।
रचलेला हा अभंग प्रसिद्ध आहे. संत जनाबाईंच्या अभंगात सेना महाराजांचा उल्लेख आहे. आपल्या चरितार्थासाठी वारीक काम करणे आणि उरलेला वेळ ईश्वर चिंतनात घालवणे असा त्यांचा दिनक्रम होता. ते बांधवगडला असताना त्यांच्याकडे साधूसंत आले.
सेना महाराज त्यांच्याबरोबर आध्यात्मिक चर्चा करत बसले असताना राजवाड्यातून त्यांना राजाचे बोलावणे आले. तेव्हा सेना महाराजांच्या पत्नीने ते थोड्या वेळात येतील, असा निरोप पाठवला. मात्र, निरोप देणाऱ्या सेवकांनी सेना महाराज त्यांचे पाहुणे गेल्याशिवाय येणार नाहीत, असा निरोप दिला. त्यामुळे राजाला राग आला.
त्याने सेना महाराजांना दरबारात हजर करण्याची आज्ञा दिली. पण तेवढ्यात भगवंत सेना महाराजांचे रूप घेऊन दरबारात हजर झाले. त्याने राजाची दाढी केली. त्यावेळेस राजा आरशात बघत असताना त्याला सेना महाराजांच्या जागी भगवंताचे रूप दिसले. राजाने देवाची पूजा केली.
सेना महाराजांच्या रूपातील देव परत गेले. थोड्यावेळाने सेना महाराज आपली धोकटी घेऊन राजाच्या सेवेसाठी आल्यावर त्यांना झालेला प्रसंग समजला. त्यांनी देवाचे आभार मानले. ह्या एका प्रसंगाने सेना महाराजांची अध्यात्मिक पातळी लक्षात येते. ह्या चमत्काराचे वर्णन स्वत: सेना महाराजांनी आणि जनाबाईंनी केलेले आहे. जनाबाई म्हणतात
रूप पालटोनी गेला सेना न्हावी विठ्ठल झाला । काखे घेऊनी धोकटी गेला राजियाचे भेटी ।। आपले हाते भार घाली राजियाची सेवा केली । विसर तो पडला रामा काय करू मेघ:शामा ।। राजा आयिन्यात आहे चतुर्भुज उभा आहे ।
हा प्रसंग स्वत: सेना महाराजांनी
करिता नित्यनेम । राये बोलाविले जाण ।। पांडुरंगे कृपा केली । राया उपरती झाली । मुख पाहता दर्पणी आत दिसे चक्रपाणी ।। कैसी झाली नवलपरी वाटीमाजी दिसे हरी । रखमादेवीवर सेना म्हणे मी पामर ।।
असे वर्णन केले आहे.
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंदे केशवा भेटताचि।।
या प्रसिद्ध अभंगात सेना महाराजांनी पंढरी महात्म्याचे वर्णन केले आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात सेना महाराज परत उत्तर भारतात गेले. स्वामी रामानंदांचे शिष्यत्व पत्करून त्यांनी हिंदी रचना केल्या. पंजाबमध्ये असताना त्यांनी पंजाबी भाषेत अनेक दोहे रचले. हे दोहे शिखांच्या पवित्र अशा गुरु ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथामध्ये समाविष्ट केले आहेत.