For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Vari Pandharichi 2025: देह निवे किती नवल सांगावे। जीवासी दुणावे ब्रह्मानंदे।।

04:47 PM Jul 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
vari pandharichi 2025  देह निवे किती नवल सांगावे। जीवासी दुणावे ब्रह्मानंदे।।
Advertisement

नामदेवराय म्हणतात आषाढी-कार्तिकी एकादशी हीच आमची सुगी आहे

Advertisement

By : ह. भ. प. अभय जगताप 

सासवड : आषाढी कार्तिकी हेचि आम्हा सुगी। शोभा पांडुरंगीं घनवटे।। संतांचे दर्शन हेंचि पीक जाण। देतां आलिंगन देह निवे।। देह निवे किती नवल सांगावे। जीवासी दुणावे ब्रह्मानंदे।। नामा म्हणे यासी मुळ पांडुरंग। त्याचेनि अव्यंग सुख आम्हा।।

Advertisement

आज आषाढी एकादशी. या आषाढी वारीचा महिमा सर्वच संतांनी विविध प्रकारे गायला आहे. संत नामदेवरायांनी या अभंगांमध्ये वाऱ्या त्यांच्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे शेतकऱ्याच्या उदाहरणाने सांगितले आहे. शेतकरी शेतामध्ये राबतो, कष्ट करतो. जेव्हा पीक येते तेव्हा त्याच्या कष्टाचे, चीज होते.

पिकाची कापणी करून धान्य घरात आणले जाते, यालाच सुगी असे म्हणतात. त्यामुळेच सुगीचा सुकाळ, संपन्नता असाही अर्थ आहे. नामदेवराय म्हणतात आषाढी-कार्तिकी एकादशी हीच आमची सुगी आहे. इतर संत आषाढी- कार्तिकी वारीसाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून पंढरपूरला येत असत. पण, नामदेवराय हे तर पंढरपूरचेच रहिवासी होते.

पंढरपूरला पांडुरंग बारा महिने आहेच. चंद्रभागाही वाहते आहे. मग असे असताना पंढरपूरकरांच्या दृष्टीने आषाढी कार्तिकीचे विशेष महत्त्व म्हणजे सर्व संत, भक्त पंढरपूरला येतात. त्यामुळे एका वेळेस सर्वांची भेट होते. या सर्व संतांचे, भक्तांचे दर्शन यालाच नामदेवरायांनी पीक असे म्हटले आहे.

यांना भेटल्यामुळे देह शांत होतो. फक्त देहालाच नाही तर जीवालासुद्धा या भेटीमुळे आनंद होतो. नामदेवरायांच्या काळात आषाढीकार्तिकी असत. चंद्रभागा स्नान करत. नगर प्रदक्षिणा करत. वाळवंटामध्ये कीर्तन, रात्री जागर होई. आता सर्व संतांच्या पालख्या आणि वैष्णवांचा मेळा आषाढी, कार्तिकीला जमतो. ‘विठ्ठल विठ्ठल गजरी। अवघी दुमदुमली पंढरी“ असे आषाढी कार्तिकीतले पंढरीचे वर्णन चोखोबारायांनी केले आहे.

जेव्हा पंढरपुरात सर्वत्र हरिनामाचा, कीर्तनाचा गजर होत असतो तेव्हा देव फक्त देवळात नाही तर या कीर्तनात, वाळवंटात सर्वत्र असतो. संत भार पंढरीत। कीर्तनाचा गजर होतो। तेथे असे देव उभा। दिसे समाचरणाची शोभा।। असे या सोहळ्याचे वर्णन जनाबाईंनी केले आहे.

वर्षभर शेतात असणाऱ्या शेतकऱ्याला सुगीचा वेगळा आनंद असतो, तसा पंढरपुरात राहणाऱ्या नामदेवरायांना आषाढी-कार्तिकीमध्ये असा हा ब्रह्मानंद मिळतो आहे. या आनंदाचे मूळ कारण पांडुरंग आहे आणि हा आनंद अव्यंग म्हणजे कोणताही उणेपणा नसलेला आहे. दशमीला सर्व संतांच्या पालख्या आणि वारकरी पंढरपूरला पोहोचलेत.

आज चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा, कीर्तन, जागर करतील. उद्या द्वादशीला उपवास सोडून बहुतांश वारकरी परतीला लागतील. आपणही 19 दिवस करत असलेल्या मानसिक वारीची आता समाप्ती होत आहे. या लेखमालेचा शेवट तुकोबारायांनी वारीसाठी मागितलेले मागणे मागून करणे उचित होईल.

हेचि व्हावी माझी आस ।

जन्मोजन्मीं तुझा दास ।।

पंढरीचा वारकरी ।

वारी चुको न दे हरी ।।

संतसंग सर्वकाळ ।

अखंड प्रेमाचा कल्लोळ ।।

चंद्रभागे स्नान ।

तुका मागे हेंचि दान ।।

Advertisement
Tags :

.