Vari Pandharichi 2025: चौदा शत झाली बुद्धी माझी गेली। सोय दाखविली मुक्ताईने।।, तुम्ही तरुनी विश्व तारा
भावंडांवर आभाळ कोसळले आणि सगळ्यात लहान असलेली मुक्ता प्रौढ झाली
By : मीरा उत्पात
ताशी : सानिवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव यांची धाकटी बहीण असलेली मुक्ताबाई साक्षात आदिमाया होती. या चार भावंडांची अध्यात्मातील उंची पाहून इह जन्मात मोहमायेपासून निवृत्ती घेऊन ईश्वरी ज्ञानाचे सोपान चढल्यावर जन्म मरणाच्या फेऱ्यांतून मुक्ती मिळते याचे आकलन होते.
ज्ञानेश्वरादि भावंडात लहान असलेल्या मुक्ताबाईचा जन्म घटस्थापनेदिवशी झाला. त्यांचे आई-वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी तत्कालीन धर्ममार्तंडांनी दिलेले देहांत प्रायश्चित्त स्वीकारून इंद्रायणीमध्ये आपला देह समर्पित केला. या प्रसंगाने भावंडांवर आभाळ कोसळले आणि सगळ्यात लहान असलेली मुक्ता प्रौढ झाली.
तिने आई होऊन आपल्या भावंडांचा सांभाळ केला. तिला निवृत्तीनाथांनी नाथसंप्रदायाची दीक्षा दिली. गुरूपदेश केला. एकदा ज्ञानेश्वरांनी मुक्ताला मांडे करायला सांगितले. तेव्हा मांडे करण्यासाठी कुंभाराकडून खापर आणायला गेलेल्या मुक्ताबाईला या चौघा भावंडांचा द्वेष करणारा विसोबा चाटी, कुंभाराला खापर द्यायचे नाही म्हणून सांगतो.
तेव्हा ज्ञानेश्वर योगसामर्थ्याने आपली पाठ तापवतात. मुक्ता त्यांच्या पाठीवर मांडे भाजते. हा सारा विलक्षण प्रकार विसोबा खिडकीतून पाहतो. त्याला तक्षणी या भावंडाचे अलौकिक सामर्थ्य कळते. तिथेच त्यांना शरण जात मुक्ताबाईंनी भाजलेले मांडे खेचराप्रमाणे झडप घालून तो घेतो आणि प्रसाद म्हणून खातो. त्यामुळे मुक्ताबाई त्याला विसोबा खेचर म्हणून संबोधते. आणि तेच त्याचे आयुष्यभरासाठी नाव पडते.
योगसिद्धीचा अहंकार झालेल्या, चौदाशे वर्षांचे आयुष्य असलेल्या चांगदेवांनापण ती ज्ञानाची दीक्षा देते. चांगदेवाला या चार भावंडांची कीर्ती ऐकून त्यांना भेटण्याची इच्छा होते. त्यासाठी ते त्यांना पत्र पाठवायचे ठरवतात. आपण वयाने ज्येष्ठ असलो तरी ज्ञानाने हे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. मग यांना पत्रात नमस्कार लिहू की आशीर्वाद? असा विचार चांगदेवाच्या मनात येतो. पण काहीच न सुचल्याने ते कोरे पत्र ज्ञानदेवांना पाठवतात.
त्यांना योगसिद्धीमुळे हिंस्त्र प्राणी वश झालेले असतात. आपला हा अधिकार दाखवण्यासाठी ते हातात नागाचा चाबूक घेऊन वाघावर बसून या भावंडांना भेटायला येतात. त्यावेळी ही सारी भावंडे सकाळी एका पडक्या भिंतीवर कोवळे ऊन खात बसलेली असतात. चांगदेवाला सामोरे जाण्यासाठी ते चौघेजण आपण बसलेली पडकी भिंत चालवतात.
आपण चेतना असलेल्या प्राण्यांना वशीभूत करू शकतो. पण या भावंडांची अचेतनांवरील सत्ता पाहून चांगदेवाचा अहंकार गळून पडतो. ते त्या भावंडांना शरण येतात. मुक्ता म्हणते चौदाशे वर्षे जगून हा चांगदेव कोरा तो कोराच राहिला. तिचे उद्गार ऐकून
चौदा शत झाली बुद्धी माझी गेली।
सोय दाखविली मुक्ताईने।।
असे म्हणत चांगदेव मुक्ताबाईला शरण येतात. मुक्ताई करे लेईले अंजन ही भावना ठेऊन तिचे शिष्यत्व पत्करतात. या प्रसंगावरून मुक्ताबाईचा अध्यात्मिक क्षेत्रातील अधिकार स्पष्ट होतो . एकदा ज्ञानेश्वर बाहेर गेल्यावर लोक त्यांचा अपमान करतात.
या गोष्टीचा ज्ञानेश्वरांना क्रोध येतो आणि ते रागावून त्यांच्या झोपडीचे दार लावून बसतात. त्यावेळी मुक्ताबाईने त्यांची विश्व रागे झाले वन्ही। संती सुखे व्हावे पाणी। अशी समजूत घातली. ज्ञानेश्वरांनी एवढ्याशा कारणावरून न रागावता सर्वसामान्य जनतेला शुद्ध ज्ञान द्यावे
सुख सागर आपण व्हावे। जग बोधे निववावे।
अशी मुक्ता आपल्या थोरल्या भावाकडून अधिकारवाणीने अपेक्षा करते. तुम्ही तरूनी विश्व तारा असे जगाच्या उद्धाराचे कार्य करण्यास प्रवृत्त करते. या प्रसंगी म्हटलेले अभंग ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. हीच ज्ञानेश्वरीची प्रेरणा आहे! ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहण्यासाठी गुरू निवृत्तिनाथांची कृपा आणि मुक्ताबाईनी आपल्या भावाकडून केलेली अपेक्षा कारणीभूत आहे. तिचे मुंगी उडाली आकाशी सारखे कूट अभंग प्रसिद्ध आहेत.