Vari Pandharichi 2025: पुण्यनगरीत भक्तीचा महासंगम, माउली व तुकोबांच्या पालखीचे भक्तिभावात स्वागत
पुणेकरांनी अत्यंत भक्तिभावात दोन्ही पालख्यांचे स्वागत केले.
By : प्रशांत चव्हाण
पुणे :
पुण्यभूमीत जाहला, भक्तीचा संगम । ओठी विठूनाम । सकळांच्या ।।
पावलोपावलावर होणार विठुनामाचा गजर...टाळ-मृदंगाचा निनाद...ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष...या नादासवे पुढे सरकणारा चैतन्यरुपी प्रवाह...अन् पुण्यभूमीत झालेला भक्तीचा महासंगम...अशा अत्यंत भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे शुक्रवारी पुण्यनगरीत आगमन झाले. पुणेकरांनी अत्यंत भक्तिभावात दोन्ही पालख्यांचे स्वागत केले.
तुकोबांची पालखी आकुर्डीहून, तर माउलींची पालखी आळंदीहून सकाळी मार्गस्थ झाली. सकाळच्या न्याहारीमुळे बळ प्राप्त झालेले वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात व अभंगाच्या तालावर नाचू-डोलू लागले. मध्ये मध्ये रिमझिम पावसाचीही सोहळ्याला साथसंगत लाभली.
पावलागणिक वारकऱ्यांचा उत्साह दुणावला. तुकोबांच्या पालखीने दुपारी दापोडीत विसावा घेतला. त्यानंतर पालखी पुन्हा पंढरीच्या वाटेवर आली. तोवर वाकडेवाडीतील मरिआई गेट चौक ते शिवाजीनगरपर्यंतचा सारा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेला. तुकोबा-माउलींच्या दर्शनाची साऱ्यांना आस लागलेली.
संचेती चौकात तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील नगारा झडला अन् भाविकांचे डोळे एकवटले. पाठोपाठ अश्व आले. भक्तांनी अश्वांचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर बरोबर विविधरंगी फुलांनी सजविलेला चांदीचा रथ दृष्टीपथात आला.
तुकोबांची पालखी येताच दर्शनासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली. महापालिकेच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. रथातील तुकोबांची पालखी अन् पादुकांवर माथा टेकवत अनेकांनी कृतार्थतेचा अनुभव घेतला. तर काहींनी डोळे भरून पादुकांचे दर्शन घेत अमृतानुभव घेतला.
तुकोबांच्या पालखीच्या आगमनानंतर भाविकांच्या नजरा संगमवाडी पुलावर खिळल्या. दिघी, कळस, विश्रांतवाडी, फुलेनगरमार्गे पालखी संगमवाडीच्या दिशेने सरकू लागली. पालखी सोहळ्याचा नगारा झडला अन् सर्वांची उत्सुकता ताणली गेली.
अश्वांच्या आगमनाने सारा परिसर आनंदून गेला. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात अन् दिंड्यादिंड्यातून होणाऱ्या हरिनामाच्या गजरासवे माउलींची नितांतसुंदर पालखी अवतरली अन् भाविकांच्या आनंदाने परमोच्च बिंदू गाठला. माउलींच्या पादुकांवर माथा टेकवण्यासाठी
भाविकांनी एकच गर्दी केली. पुणे महापालिकेच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. दोन्ही पालख्यांचा संगम होताच वैष्णवांच्या या मेळ्याला महामेळ्याचे रूप प्राप्त झाले. वारकऱ्यांचा हा भक्तिप्रवाह संचेती चौक, फर्ग्युसन रस्तामार्गे ज्ञानेश्वर पादुका चौक व तुकाराम पादुका चौकात आला.
ग्यानबा-तुकारामचा एकच गजर जाहला. अवघी पुण्यनगरी ज्ञानोबा-तुकोबा नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली. पालख्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांनी दुतर्फा मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी पालख्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
माउलींची पालखी रात्री पालखी विठोबा मंदिरात, तर तुकोबांची पालखी निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामासाठी विसावली. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर दोन्ही पालख्या रविवारी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतील.