Vari Pandhrichi 2025: माउलींचे नीरा स्नान, भक्तिरसात न्हालेली एक दिव्य अनुभूती
देखण्या सजावटीत सजलेली बैलजोडी वारकरी मंडळींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली
By : गणेश भंडलकर
लोणंद :
नीरा भिवरा पडता दृष्टी। स्नान करिता शुद्ध सृष्टी ।।
संत नामदेव महाराजांच्या या अभंगाच्या गजरात पवित्र नीरा नदीच्या जलात आज पंढरीकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना सचैल स्नान घालण्यात आले. राजा-प्रधान नाव असणाऱ्या बैलजोडीने संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ओढत घेऊन नदीचा पूल ओलांडला.
दुपारी दोन वाजता पुणे जिल्हा सोडत पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. त्यानंतर श्रद्धेचा महामेरू म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी, भक्तिभावाने भरलेल्या वातावरणात नीरा नदीच्या पवित्र जलात स्नानासाठी दाखल झाली. नीरा घाटावर पारंपरिक पद्धतीने, हरिपाठाच्या गजरात, माउलींच्या पवित्र पादुका स्नान घडवण्यात आले.
यावर्षी या सोहळ्यात एक विशेष आकर्षण ठरली ती म्हणजे ‘राजा-प्रधान‘ ही देखणी बैलजोडी, जिला पालखी ओढण्याचा मान लाभला. देखण्या सजावटीत सजलेली ही बैलजोडी वारकरी मंडळींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. पारंपरिक हरण, गोंडस सिंगांचे टोक, घुंगरांची नादमय झंकार आणि रंगीबेरंगी हार-फुले याने सजलेली ‘राजा-प्रधान’ जोडीने संपूर्ण सोहळ्यात भारावलेपण निर्माण केले.
स्नानासाठी अगदी पहाटेपासूनच हजारो वारकरी आणि स्थानिक भाविक नीरा घाटावर जमले होते. स्नानाच्या वेळी नदीकिनारी भारलेलं वातावरण, टाळ-मृदुंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा जयघोष आकाशात घुमत होता. माउलींच्या पादुकांवर पंचामृत, गंगाजल आणि फुलांचा वर्षाव करण्यात्त आला.
घाटावरची सुंदर पुष्परचना आणि विविध धार्मिक विधींमुळे संपूर्ण परिसर आध्यात्माने न्हाऊन गेला होता. स्नानानंतर माउलींच्या पादुका रथात विराजमान झाल्या आणि पालखी पुढील मुक्कामी लोणंद मुक्कामी निघाली. नीरा स्नान ही केवळ एक परंपरा नाही, तर ती माउलीचरणी समर्पित होण्याची भक्तिरसपूर्ण अनुभूती आहे, या भावनेने हजारो भाविकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला.