Vari Pandharichi 2025: माउलींचे आज प्रस्थान, आळंदीत दिमाखदार सोहळा रंगणार
यंदा माऊलींचे 750 वे जन्मोत्सव वर्ष, सोहळ्याला लाखेंच्या संख्येने वारकरी
आळंदी, पुणे/ प्रतिनिधी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान आज, 19 जून रोजी रात्री 8 वाजता आळंदी येथून होणार आहे. यंदा माऊलींचे 750 वे जन्मोत्सव वर्ष असल्याने या सोहळ्याला लाखेंच्या संख्येने वारकरी आणि भाविक येण्याची शक्मयता आहे.
प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी देवस्थान, नगरपरिषद, पोलिस प्रशासन, आरोग्य आणि महसूल विभाग युद्धपातळीवर तयारी करत आहेत. यंदा पावसाचे प्रमाण जास्त राहण्याचा अंदाज असल्याने शासनाकडून निवारा आणि विजेच्या चोख व्यवस्थेची मागणी करण्यात आली आहे.
आळंदी संस्थानचे अध्यक्ष भावार्थ देखणे अधिक माहिती देताना म्हणाले, माउलींच्या पादुका आणि पालखी ज्या रथात ठेवली जातात, त्या चांदीच्या रथाची डागडुजी, पॉलिश, रंगकाम पूर्ण झाले आहे. यंदा बैलजोडीचा मान घुंडरे कुटुंबियांना मिळाला आहे. मानाची बैलजोडी जुंपून मागच्या मंगळवारी चाकण रोडवर यशस्वी चाचणी घेण्यात आली.
यावेळी बैलजोडी मानकरी, देवस्थान कर्मचारी उपस्थित होते. संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान 18 जूनला आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रस्थान सोहळ्याला आलेले भाविक माउलींच्या समाधीचे दर्शन घेतात. या दृष्टिकोनातून गर्दी आणि भाविकांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे.
दिमाखदार सोहळा रंगणार
प्रस्थान सोहळ्यादरम्यान माऊलींच्या पादुका पालखी रथात ठेवल्या जातात. रथापुढे शितोळे सरकारांचे अश्व, नगारा आणि 27 दिंड्या असतात, तर रथामागे 350 दिंड्या आणि मोठ्या संख्येने मोकळ्या दिंड्या सहभागी होतात. प्रस्थानाच्या वेळी माऊली मंदिर परिसरात रथापुढील 27 आणि रथामागील 20 दिंड्यांना प्रवेश दिला जातो.
यंदा दर्शनबारी भक्ती सोपान पुलावरून नसून नवीन स्कायवॉकवरून आयोजित केली जाणार आहे. प्रस्थानाच्या दिवशी गुऊवार असल्याने रात्री 8 वाजता सोहळा सुरू होईल, वारकरी, भाविकांनी दुपारपासूनच मंदिर परिसरात गर्दी करून नये असे, आवाहन माऊली संस्थानकडून करण्यात आले आहे.
सहा लाख भाविकांचा अंदाज
यंदा चांगल्या पावसामुळे शेतकरी शेतीची कामे आणि पेरणी पूर्ण करून देहू आळंदीमध्ये दर्शनासाठी येतील. त्यामुळे 5 ते 6 लाख भाविक माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी येण्याची शक्मयता आहे, असे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.
माउलींच्या 750 व्या जन्मोत्सव वर्षाचे औचित्य
यंदा माउलींच्या 750 व्या जन्मोत्सव वर्षानिमित्त हा सोहळा अधिक भव्य होणार आहे. 19 जून रोजी प्रस्थानानंतर 20 जूनला पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईल आणि 20 व 21 जूनला पुण्यात मुक्काम करेल.
प्रस्थान रात्री आठला
प्रस्थान 19 जून 2025, रात्री 8 वाजता (गुऊवार) होईल. दर्शनबारीमध्ये एकावेळी 10 हजार भाविकांसाठी व्यवस्था आहे. आरतीचा कार्यक्रम सायंकाळी साडेसात वाजता असून त्यानंतर मानाच्या 47 दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश दिला जाणार आहे. रात्री आठनंतर पालखीचे प्रस्थान होईल. श्री गुरू हैबतबाबांनी ठरवून दिलेल्या प्रथेप्रमाणे सोहळा पार पडेल.