Vari Pandharichi 2025: माउली, माउलीचा गजर, पुरंदावडेत माउलींचे पहिले गोल रिंगण उत्साहात
सकाळी सहा वाजता सोहळ्याने माळशिरसकडे प्रस्थान केले
By : विवेक राऊत
नातपुते : माउली माउलीच्या नामघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण आज पुरंदावडे (ता. माळशिरस) येथे मोठ्या उत्साहात पार पडले. नातेपुते येथे पहाटे 4.30 वाजता पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते महापूजा झाला. त्यानंतर सकाळी सहा वाजता सोहळ्याने माळशिरसकडे प्रस्थान केले. सकाळचा विसावा मांडवी ओढ्यावर झाला. याठिकाणी माउलींना नैवेद्य आणि जेवणे झाली.
माउलींच्या पालखी सोहळ्यात प्रत्येक जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. यंदा हे महिन्यात मुसळधार पाऊस कोसळला होता या पार्श्वभूमीवर शासनाने ठिकठिकाणी वारकऱ्यांच्या सोयीसाठी पाऊस भरपूर होणार हे गृहीत धरून वॉटरप्रुफ मंडप उभारले आहेत. परंतु, पावसाने दडी मारल्याने सोहळ्यात धुळीने अनेकांचे घसे बसलेले आहेत. पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
रिंगण मैदानाजवळ उड्डाण पूल असल्याने या उड्डाण पुलावरून हजारो वारकरी, स्थानिक लोकांनी रिंगण पाहण्यासाठी गर्दी केली होती. चोपदार राजाभाऊ आणि रामभाऊ यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे सोहळा दरवर्षी पेक्षा एक ते दीड तास अगोदर प्रत्येक ठिकाणी पोहोचतो आहे. रिंगणाच्या नंतर प्रत्येक दिंडीमध्ये संत खेळ सुरू होते. यामध्ये पावले, फुगडी, हमामा, पिरॅमिडच्या आणि नंतर उडी होऊन रिंगण सोहळा झाला.
आज सकाळी माउली निघाल्यापासून ढगाळ वातावरण होते. भिरभिरत्या वाऱ्यात लाखो वारकऱ्यांसह माउलींचा वैभवी सोहळा पुरंदावडे येथील भव्य मैदानात दुपारी 12 वाजता दाखल झाला. यावेळी चोपदारांनी ओळीने दिंड्या आत सोडल्या. रिंगण मैदानाला प्रदक्षिणा करून दिंड्यादिंड्यामधून पाऊले खेळत नामघोष सुरू होता.
याच वेळी पताकाधारी वारकऱ्यांना माउलींच्या पालखीच्या सभोवती गोलाकार उभे करण्यात आले. माउलींचे आणि अश्वांचे पूजन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी केले. उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, मंगेश चव्हाण, सपोनि महारुद्र परजणे आणि इतर अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रिंगण सोहळ्यात आणि पालखी मार्गांवर चोख बंदोबस्त ठेवला होता.
राजाभाऊ, रामभाऊ, सार्थक, वेदांत चोपदार यांनी रिंगण लावून घेतले. त्यानंतर भोपळे दिंडीतील मानाच्या जरीपटक्याने रिंगण मैदानाला दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. चोपदारांनी अश्व स्वार तुकाराम कोळी यास अश्व सोडण्याची सूचना दिली. त्याने एक फेरी पूर्ण केली. यानंतर माउलींचा अश्व सोडण्यात आला. राजाभाऊ, रामभाऊ चोपदार, राजाभाऊ आरफळकर मालक आदींनी वारकऱ्यांकडून उडीचे खेळ शिस्तीत करून घेतले.
खुडूस येथे उद्या दुसरे गोल रिंगण
पुरंदावडेच्या सरपंच राणी मोहिते, उपसरपंच देविदास ढोपे, पांडुरंग, नारायण, भानुदास सालगुडे पाटील, कामगार केसरी ज्ञानदेव पालवे आणि श्री शंकर साखर कारखान्याचे संचालक, अधिकारी आणि पंचक्रोशीतील हजारो लोक उपस्थित होते. आजचा मुक्काम माळशिरस शहरात होणार असून पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण बुधवारी सकाळी खुडूस येथे होणार आहे. बुधवारचा मुक्काम वेळापूर येथे आहे.
दोन मिनिटांत तीन फेऱ्यांनंतर रिंगण पूर्ण
माउलींच्या अश्वांने दौडण्यास सुरुवात करताच लाखो उपस्थितांनी टाळ्या वाजवत माउली माउलीचा गजर केला आणि दोनच मिनिटांत तीन फेऱ्यांनंतर रिंगण पूर्ण झाले. रिंगण पूर्ण होताच उपस्थितांची अश्वांच्या टाचे खालची माती कपाळी लावण्यासाठी झुंबड उडाली. यानंतर चोपदारांनी दिंड्यांना उडीचे निमंत्रण दिले. माउलींच्या सभोवताली हजारो टाळकऱ्यांनी भजन सुरू केले. शेकडो पखवाजाच्या एक सुरांतून वातावरण भारले होते.
वारकऱ्यांसाठी वॉटरप्रुफ मंडप :
- माउलींच्या पालखी सोहळ्यात प्रत्येक जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. यंदा हे महिन्यात मुसळधार पाऊस कोसळला होता या पार्श्वभूमीवर शासनाने ठिकठिकाणी वारकऱ्यांच्या सोयीसाठी पाऊस भरपूर होणार हे गृहीत धरून वॉटरप्रुफ मंडप उभारले आहेत. परंतु, पावसाने दडी मारल्याने सोहळ्यात धुळीने अनेकांचे घसे बसलेले आहेत. पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
- रिंगण मैदानाजवळ उड्डाण पूल असल्याने या उड्डाण पुलावरून हजारो वारकरी, स्थानिक लोकांनी रिंगण पाहण्यासाठी गर्दी केली होती.
- चोपदार राजाभाऊ आणि रामभाऊ यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे सोहळा दरवर्षी पेक्षा एक ते दीड तास अगोदर प्रत्येक ठिकाणी पोहोचतो आहे.
- रिंगणाच्या नंतर प्रत्येक दिंडीमध्ये संत खेळ सुरू होते. यामध्ये पावले, फुगडी, हमामा, पिरॅमिडच्या आणि नंतर उडी होऊन रिंगण सोहळा झाला.