Vari Pandharichi 2025: ग्यानबा तुकाराम.. ग्यानबा तुकाराम, सासवडनगरी भक्तिरसात चिंब
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडमुक्कामी दाखल झाला
पुणे : टाळ मृदंगाचा गजर, ज्ञानोबा तुकोबा नामाचा जयघोष...अन् संत ज्ञानेश्वर माउलींच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा...यामुळे सासवडनगरी सोमवारी भक्तिरसात चिंब झाली. तर हरिनामाच्या गजरात आलेल्या संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे यवतमुक्कामी हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले.
टाळ मृदंगाचा गजर, ज्ञानोबा तुकोबा नामाचा जयघोष...अन् संत ज्ञानेश्वर माउलींच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा...यामुळे सासवडनगरी सोमवारी भक्तिरसात चिंब झाली. तर हरिनामाच्या गजरात आलेल्या संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे यवतमुक्कामी हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा रविवारी सासवडमुक्कामी दाखल झाला. सासवडकरांनी पालखी सोहळ्याचे मनोभावे आदरातिथ्य केले. सासवड ग्रामस्थांकडून अन्नदानासह विविध उपक्रम राबविण्यात आले. वारकऱ्यांच्या सहवासाने सासवडनगरी भक्तिरसात चिंब झाली. सासवडला दोन दिवस माउलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो.
मुक्कामाच्या दिवशी सोमवारी सकाळी सर्व पूजाविधी पार पडले. त्यानंतर दिवसभर सासवडमध्ये हरिनामाचा गजर सुरू होता. अभंगाच्या तालावर वारकरी नाचत, डोलत होते. त्यामुळे अवघी सासवडनगरीत विठ्ठलमय होऊन गेली. मंगळवारी पालखी सासवडहून जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. पालखी मार्गावरचा जेजुरीच्या मुक्कामालाही वारकरी संप्रदायात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे वारकऱ्यांचे डोळे आता जेजुरीच्या खंडेरायाकडे लागले आहेत.
वारकऱ्यांची मसाज सेवा
संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यात महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या नवनाथ काकडे यांच्या वतीने मसाज सेवा शिबिर घेण्यात आले. या उपक्रमास योग विद्या धाम, पिंपरी चिंचवड संस्थेचेही सहकार्य लाभले. यवत येथे घेण्यात आलेल्या या मसाज सेवेमध्ये पिंपरी-चिंचवडमधील चिखली, मोरेवस्ती येथील शब्दब्रम्ह विविधांगी सेवा संस्थेच्या योगसाधकांनीही सहभाग घेतला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर चव्हाण, योगशिक्षक दत्तात्रेय महापुरे, मेघना आंब्रे, स्मिता जाधव, राहुल कंकनाळ, अथर्व तुपे यांच्यासह अन्य सदस्यांनी ही सेवा ऊजू केली. दरम्यान तुकोबांची पालखी मंगळवारी वरवंड मुक्कामी दाखल होईल.
तुकोबांचा पालखी सोहळा यवत मुक्कामी
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा रविवारी लोणी काळभोर येथे मुक्काम होता. सोमवारी सकाळी पालखी यवतच्या दिशेने मार्गस्थ झाली. टाळ नादासवे वारकरी पंढरीची वाट चालू लागले. विठूरायाचा आत्मिक लळा आणि ज्ञानोबा तुकोबा नामाचा गजर करीत पालखी सोहळा यवत मुक्कामी पोहोचला. ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावात पालखी सोहळ्याचे स्वागत केले. तुकोबाच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी उसळली.
माउली आज जेजुरीत, तुकोबांचा वरवंडला मुक्काम
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी सकाळी बोरावके मळ्यात विसावा घेईल. त्यानंतर यमाई शिवरी येथे दुपारचा नैवेद्य होईल. दुपारचा विसावा साकुर्डेत होईल तर रात्रीच्या मुक्कामाला पालखी जेजुरीत असेल. तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा शुक्रवारी दुपारचा विसावा भांडगाव येथे होईल. तिसरी विश्रांती केडगाव चौफुला येथे, तर रात्रीचा मुक्काम वरवंड येथील विठ्ठल मंदिरात असेल.
सोपान काकाच्या सासवडमध्ये दोन दिवसाच्या मुक्कामानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली महाराजांचा पालखी सोहळ्याने मंगळवारी जेजुरीच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना आता मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भेटीची आस लागलेली आहे. तर यवत येथील मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराजांची पालखी मंगळवारी (दि. 24) रात्री वरवंड (ता. दौंड) येथे मुक्कामी येणार आहे.
वरवंड गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पालखीचा मुक्काम असतो. पालखीच्या मुक्कामाची आणि पालखीसोबत येणाऱ्या सर्व वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी वरवंड ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि प्रशासन सज्ज झाले आहे. पालखी मुक्कामाच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात साफसफाई करून मंदिरास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.