Vari Pandharichi 2025: माउलींच्या अश्र्वाची दमदार दौड, वारीच्या वाटेवर रंगले दुसरे गोल रिंगण
खुडूस येथील रिंगण सोहळ्यापूर्वी महिला वारकऱ्यांनी हरिनामाच्या गजरात फेर धरले
By : विवेक राऊत
नातेपुते : ज्ञानोबा तुकारामचा अखंड जयघोष... डौलाने फडकणाऱ्या वारकरी पताका... वारकऱ्यांचा अथांग सागर... माउलींच्या अश्वाची दमदार दौड अशा वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण रंगले. खुडूस (ता. माळशिरस) येथे बुधवारी सकाळी नऊ वाजता हे रिंगण झाले.
माळशिरस येथे पहाटे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते पहाटपूजा होऊन सोहळ्याचे सकाळी सहा वाजता वेळापूरकडे प्रस्थान झाले. आज सकाळपासून वातावरण ढगाळ होते. वारकऱ्यांची झपझप पावले पंढरीकडे वाटचाल करीत होते. खुडूस येथील रिंगण सोहळ्यापूर्वी महिला वारकऱ्यांनी हरिनामाच्या गजरात फेर धरले.
सकाळी नऊ वाजता रिंगण स्थळी अश्वांचे आगमन झाले. यावेळी खुडूसचे सरपंच, उपसरपंच, प्रकाश पाटी ल, श्री ले खा पाटील आदींच्या हस्ते यावेळी पूजन केले. चोपदार राजाभाऊ, रामभाऊ, सार्थक, वेदांत चोपदार यांनी रिंगण लावून घेतले. त्यानंतर भोपळे दिंडीच्या मानाच्या जरीपटक्याने रिंगण प्रदक्षिणा पूर्ण केली.
नऊ वाजता स्वारांच्या आणि माउलींच्या अश्वाने दौडीस प्रारंभ केला. डोळ्याचे पाते लवते ना लवते तोपर्यंत अश्वांनी रिंगणास प्रारंभ केला. रिंगण सुरू असताना दिंड्यामधून अखंड भजनाचा जयघोष सुरू होता. अश्वांची दौड झाल्यानंतर चोपदारांनी दिंड्यांना उडीसाठी निमंत्रण दिले. माउलींच्या पालखीच्या सभोवती हजारो टाळकऱ्यांनी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष सुरू केला. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते.