Vari Pandhrichi 2025: निळा म्हणोनी जानोनी संत। येती धावती प्रतिवर्षी।।, माउली हैबतबाबांच्या भूमीत
नीरा येथून पुणे जिह्याचा निरोप घेत पालखी सोहळा पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाला
By : निलेश गायकवाड
खंडाळा :
निळा म्हणोनी जानोनी संत।
येती धावती प्रतिवर्षी ।।
टाळ-मृदंगाचा गजर अन् हरिनामाच्या जयघोषात ‘नीरा स्नान’ आटोपून ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी सातारा जिह्यातील पाडेगाव येथे आगमन झाले. दरम्यान, ऊन सावल्यांचा खेळ आणि हरिनामाच्या गजरात, भक्तीमय वातावरणात हैबतबाबांच्या भूमीत माउलींचा सोहळा एक दिवसासाठी लोणंद नगरीत विसावला.
आळंदी ते पंढरपूर असा संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा मार्गक्रमण करीत आहे. माझ्या जीवाची आवडी..., पंढरपुरा नेईन गुढी, असे अभंग आळवीत विठुरायाच्या भेटीची आस मनी लागल्याने मजल दरमजल करत मुखी माउली माउली असे नामस्मरण करीत पिंपरे खुर्द येथील सकाळची न्याहरी उरकून सोहळा पुढे नीरा येथे दुपारी दाखल झाला. नीरा येथून पुणे जिह्याचा निरोप घेत दोन वाजण्याच्या सुमारास सोहळा पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाला.
सातारा जिह्याच्या सीमेवरील पाडेगाव (ता. खंडाळा) येथील दत्त घाटावर माउलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले. माउली, माउली असा जयघोष झाल्याने परिसर दुमदुमून गेला. पाडेगाव येथील समता आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचा ढोल ताशांचा गजर, भक्तिमय वातावरणात टोल नाक्यानजीक दोन वाजून 40 मिनिटाने ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा सातारा जिह्यात प्रवेश झाला.
त्यानंतर पाडेगाव हद्दीत जुन्या टोल नाक्याजवळ ज्ञानेश्वर माउलींचा रथ आल्यानंतर पुष्पवृष्टी करीत जल्लोषी स्वागत सोहळा पार पडला. माउलींच्या पालखीचे सातारा जिह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, मनोज घोरपडे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्वागत केले. त्यानंतर लोणंदच्या वेशीवर नगराध्यक्षा मधुमती गालिंदे, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी आदीसह मान्यवरांनी स्वागत केले.
पुष्पवृष्टी आणि मानवंदना
पाडेगाव टोलनाक्यावर सातारा जिह्याच्या वतीने पालखीचे औपचारिक स्वागत झाले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विशेष स्वागत मंडळ तैनात होते. फुलांची उधळण करत पालखीला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
‘राजा-प्रधान’चा देखणा सोहळा
यावर्षी पालखी ओढण्याचा मान मिळालेली ‘राजा आणि प्रधान’ ही देखणी बैलजोडीही या स्वागत सोहळ्याचे केंद्रबिंदू ठरली. भाविकांनी विशेष कौतुकाने त्यांच्या सजावटीचे दर्शन घेतले आणि फोटोंसह क्षण टिपले.
तुकाराम महाराजांची पालखी बारामतीत दाखल
बारामती : संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज बारामती शहरात दाखल झाला. प्रशासनाच्या वतीने पालखी रथआणि दिंड्यांचे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. बारामती शहरात चौकाचौकात विविध संस्था संघटनांच्याकडून पालखी रथाचे, दिंड्याचे स्वागत करण्यासाठी मंडप उभारले आहेत. सेवाभावी संस्थांकडून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा, अल्पोपहार, फळे, पाणी पुरवठा आणि इतर सेवा पुरवण्यात येत आहेत.