For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Vari Pandharichi 2025: टाळी वाजवावी गुढी उभारावी। वाट हे चालावी पंढरीचा ।।

03:34 PM Jul 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
vari pandharichi 2025  टाळी वाजवावी गुढी उभारावी। वाट हे चालावी पंढरीचा ।।
Advertisement

पंढरपुरातल्या भक्तीच्या केंद्रात म्हणजे चंद्रभागेच्या वाळवंटात मात्र प्रवेश होता

Advertisement

By : ह.भ.प. अभय जगताप 

सासवड :

Advertisement

टाळी वाजवावी गुढी उभारावी।

वाट हे चालावी पंढरीचा ।।

पंढरीचा हाट कउलांची पेठ।

मिळाले चतुष्ट वारकरी।।

पताकांचे भार मिळाले अपार।

होतो जय जयकार भीमातीरीं ।।

हरिनाम गर्जतां भय नाहीं चिंता। ऐसे बोले गीता भागवत ।।

खट नट यावें शुद्ध होउनी जावें। दवंडी पिटी भावें चोखामेळा ।।

मंगळवेढ्याचे संत चोखामेळा, त्यांच्या पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, मेहुणे बंका आणि मुलगा कर्ममेळा ही सर्व एका कुटुंबातील संत मंडळी. तत्कालीन अस्पृश्य समाजात जन्मलेल्या चोखोबांच्या परिवाराला त्यावेळेस अस्पृश्यांवर असलेल्या सर्व बंधनांना सामोरे जावे लागले.

त्यांना विठ्ठल मंदिरात, सवर्णांच्या घरात प्रवेश नव्हता. पण पंढरपुरातल्या भक्तीच्या केंद्रात म्हणजे चंद्रभागेच्या वाळवंटात मात्र प्रवेश होता. किंबहुना याचसाठी वाळवंटाची निवड झाली होती. चोखोबारायांची अभंगरचना अनंगभट्ट नावाच्या ब्राह्मणाने लिहून ठेवली.

या अभंगात चोखोबांनी पंढरपूरला जाण्याचा उपदेश केला आहे. पंढरपूरला जायचे ते टाळी वाजवत, गुढी म्हणजे ध्वज पताका घेवून. ज्ञानेश्वर माउलींनीही ‘माझ्या जीवीची आवडी ।पंढरपुरा नेईन गुढी।’ असे म्हटले आहे. पांडुरंगाचे कृपेने वसली आहे येथे चारही दिशांनी वारकरी आले आहेत. चतुष्टचा अर्थ चार प्रकारचे असाही होतो.

भक्तांचे चार प्रकार गीतेत सांगितले आहेत. अर्थार्थी म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी भक्ती करणारे, जिज्ञासू म्हणजे जाणण्यासाठी भक्ती करणारे, आर्त म्हणजे संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी भक्ती करणारे आणि ज्ञानी म्हणजे ज्याचे सर्व प्रकारचे भेद मावळले आहेत असा भक्त. यात्रेमुळे पंढरपुरात सर्वत्र पताका वारकरी ध्वज दिसत आहेत. भीमा तीरी वाळवंटात जयजयकार चालू आहे.

आम्हा न नकळे ज्ञान नकळे पुराण। वेदांचे वचन नकळे आम्हा।’ अशीच चोखोबांनी वर्णिलेली त्यांची अवस्था आता बहुतेक सर्वांचीच आहे. अर्थात हे न कळताही भक्ती करता येईल, असे साधन मिळाले आहे. संतांनी नामस्मरण हा सर्वांना साधनाला सुलभ उपाय दिला आहे.

त्यामुळे आता चिंतेचे कारण नाही, अशी ग्वाही गीता, भागवत आदी ग्रंथांनी दिली आहे. त्यामुळे चोखोबा आताही दवंडी पिटत सर्वांना पंढरपूरला येण्याचे आवाहन करत आहेत. हे आवाहन खट, नट अशा सर्वांनाच आहे. हे आवाहन पंढरपूरला येऊन या भक्तीरसात न्हावून, नाम घेऊन शुद्ध होण्याचे आहे.

ज्या चोखोबारायांना वर्णाभिमानी लोक अस्पृश्य मानत होते, त्या चोखोबारायांनीच आता इतरांना शुद्ध होण्याचे आवाहन केले आहे. हा आत्मविश्वास त्यांना गीता, भागवत आणि वारकरी संतांनी दाखवलेल्या मार्गाने आला आहे.

Advertisement
Tags :

.