संस्कृतभारती प्रांतसंमेलन उत्साहात साजरे
उत्तर कर्नाटकातील कार्यकर्ते सहभागी : विविध कार्यक्रमांनी समारोप
बेळगाव : संस्कृतभारती प्रांतसंमेलनाला शनिवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, समाजसेवक मिलिंद बडकुंद्री, अशोक परांजपे, सुहासकुमार शेट्टी आदींच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. तीन वर्षांतून एकदा संस्कृत प्रांतसंमेलनाचे आयोजन केले होते. यंदा बेळगाव शहरात हे संस्कृत प्रांतसंमेलन आयोजित केले होते. संस्कृत घरोघरी पोहोचावे यासाठी संस्कृतभारतीचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून दोनदिवसीय प्रांतसंमेलन आयोजित करण्यात आले होते. याबरोबरच वस्तू आणि विज्ञान प्रदर्शन मांडण्यात आले होते. यामध्ये दैनंदिन जीवनात लागणारे साहित्य आणि त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात याची मांडणी करण्यात आली होती. यावेळी आरपीडी सर्कल, गोवावेसमार्गे मराठा मंदिर येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली. उत्तर कर्नाटकातील 19 जिल्ह्यांतील संस्कृत प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते. रविवार दि. 12 रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. गोपाळ जीनगौडा, रत्नप्रभा बेल्लद, लेखिका माधुरी शानभाग यासह इतर मान्यवर उपस्थित होते. विविध कार्यक्रमांनंतर प्रांतसंमेलनाची सांगता झाली.