संजू सॅमसनच्या बोटाला दुखापत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघातील यष्टीरक्षक आणि फलंदाज संजू सॅमसन याच्या हाताच्या बोटाचे हाड मोडल्याने त्याला किमान 5 ते 6 आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागेल.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी इंग्लंड विरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात खेळताना आर्चरच्या गोलंदाजीसमोर सॅमसनला ही दुखापत झाली होती. आर्चरचा उसळता चेंडू सॅमसनच्या बोटावर आदळला. त्याला या कालावधीत बऱ्याच वेदना झाल्या. त्यामुळे बदली खेळाडू म्हणून ज्युरेलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रणजी क्रिकेट स्पर्धेतील केरळ आणि जम्मू काश्मिर यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना पुणे येथे 8 ते 12 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. या सामन्यातही सॅमसन खेळू शकणार नाही.
नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत सॅमसनला अधिक धावा जमविता आल्या नाहीत. आता इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी त्याचा भारतीय संघामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. रविवारच्या सामन्यात सॅमसनने आर्चरच्या षटकामध्ये 1 षटकार आणि 1 चौकार ठोकला होता. सॅमसनच्या बोटाचे हाड फ्रॅक्चर झाले असून त्याला किमान दीड महिना विश्रांती घ्यावी लागेल, असे सांगण्यात आले.