संजू परब यांच्याकडून नाईक कुटुंबाला आर्थिक मदत
दोडामार्ग – वार्ताहर
साटेली भेडशी येथे घरगुती सिलिंडरच्या स्फोटात घर जळाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. यात अंकिता अर्जुन नाईक यांचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले होते. शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी अंकिता नाईक यांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत सुपूर्त केली. अंकिता नाईक यांनी संजू परब यांचे आभार व्यक्त केले.साटेली भेडशी वरचा बाजार येथील अंकिता नाईक यांचे नवीन घर बांधकाम सुरू आहे. त्यामुळे त्या दुसऱ्या घरात तात्पुरत्या राहत होत्या. मंगळवारी दुपारी त्या शेजाऱ्यांकडे गेल्या असता त्यांच्या घरातून मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला होता. घरातून मोठ्या धुराचे लोट बाहेर पडत होते. क्षणातच आग पेटली व आगीने रौद्ररूप धारण केले होते. या दुर्घटनेत त्यांच्या घरातील रोख रकमेसह कपाट, फ्रिज, कपडे, पुस्तके, सोफासेट, खुर्च्या, लाकडी बिछाना आगीत जळून खाक झाले होते. संपूर्ण घरच आगीत भस्मसात झाले होते.या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख संजू परब यांनी अंकिता नाईक यांची भेट घेत घडलेली घटना जाणून घेतली. त्यानंतर त्यांना आर्थिक मदत सुपूर्त केली. यावेळी त्यांच्यासोबत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, गोपाळ गवस उपस्थित होते.