प्रसिद्ध शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या सुसाईड नोटमधल्या ‘I am a good fool’ वाक्याने चर्चेला उधाण; पोलिस तपास सुरू
लातूर : शहरातील शिक्षण क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व संजीव सोनवणे यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधील मजकूर समोर आल्याने या प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. इंग्रजीत लिहिलेल्या या नोटमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये आणि तपास करू नये, असा आशय नमूद केल्याचे वृत्त आहे. नोटच्या शेवटी लिहिलेल्या ‘I am a good fool’ या वाक्यामुळे विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनवणे यांनी नोटमध्ये आपल्या मृत्यूला कोणालाही कारणीभूत धरू नये, तसेच आपण स्वेच्छेने हे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख केला आहे. त्यानंतर त्यांनी ‘I am a good fool’ असे लिहून स्वाक्षरी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या एका वाक्यावरून त्यांच्या मृत्यूमागील कारणाबाबत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. नोटचा संदर्भ आणि त्यावेळची परिस्थिती तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.
नेमका अर्थ काय? तपासानंतरच स्पष्टता
‘I am a good fool’ या वाक्याचा अर्थ परिस्थिती आणि संदर्भानुसार वेगवेगळ्या प्रकारे घेतला जाऊ शकतो. त्यामुळे या वाक्याचा आधार घेऊन कोणताही निष्कर्ष काढण्याऐवजी पोलिसांकडून सुसाईड नोटमधील मजकूर, घटनास्थळावरील परिस्थिती आणि इतर उपलब्ध पुराव्यांची पडताळणी केली जात आहे.
राहत्या घरी गोळी झाडून घेतल्याचे वृत्त
संजीव सोनवणे यांनी लातूर येथील राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याचे वृत्त आहे. मंगळवारी सकाळी ही घटना समोर आल्यानंतर लातूर शहरात खळबळ उडाली. त्यावेळी त्यांचे कुटुंबीय परदेशात असल्याची माहिती समोर आली आहे.
सोनवणे यांचा शैक्षणिक क्षेत्रात मोठा सहभाग होता. त्यांनी परळी येथे संकल्प कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील कामाला सुरुवात केली. त्यानंतर लातूरमध्येही संकल्प कोचिंग क्लासेस सुरू करण्यात आले. पुढे चंद्रभानू सोनवणे महाविद्यालय तसेच बार्शीजवळील उकडगाव येथे शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. काही वर्षांपूर्वी खडकवासला येथेही शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यात आले होते.
या घटनेमुळे सोनवणे यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील परिचितांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. मृत्यूपूर्वीच्या पत्राचा नेमका संदर्भ आणि या घटनेमागील परिस्थिती काय होती, हे पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे. लातूर शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.