संजीव खन्ना होणार 51 वे सरन्यायाधीश
सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार : 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे 51 वे सरन्यायाधीश होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या नावाची सरकारकडे शिफारस केली आहे. केंद्रीय कायदा मंत्रालयाने केलेल्या विनंतीनुसार विद्यमान सरन्यायाधीशांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड हे पुढील महिन्यात 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यानंतर त्यांच्या जागी न्यायमूर्ती संजीव खन्ना हे पदभार स्वीकारतील.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे नाव ज्येष्ठता यादीत असल्यामुळे त्यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. मात्र, त्यांचा कार्यकाळ केवळ सहा महिन्यांचा असणार आहे. 64 वषीय न्यायमूर्ती खन्ना 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती खन्ना यांनी 65 निवाडे लिहिले आहेत. या कालावधीत ते सुमारे 275 खंडपीठांचा भाग राहिले आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयात 14 वर्षे न्यायाधीश
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा जन्म 14 मे 1960 रोजी झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या पॅम्पस लॉ सेंटरमधून कायद्याचे शिक्षण घेतले. पदवीनंतर त्यांनी 1983 मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्यापूर्वी ते 14 वर्षे दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. 2019 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली. 32 न्यायाधीशांना डावलून न्यायमूर्ती खन्ना यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.