संजयकाका पाटील अन् शरद पवारांची मोतीबागेत भेट तालुक्यासह जिल्ह्यात चर्चांना उधाण
राजकीय वर्तुळात खळबळ
तासगाव प्रतिनिधी
राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सांगली जिल्ह्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. बुधवारी भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुणे येथे मोतीबागेत भेट घेतली. त्यांच्या या भेटीने सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सोशल मिडियात यावर जोरदार चर्चा सुरू होत्या.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनी तत्कालिन खासदार संजय पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळू नये यासाठी विरोध केला होता. तरीही भाजपकडून पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. निवडणुकीत भाजपमधूनच अंतर्गत विरोध झाला. त्याचा फटका माजी खासदार संजय पाटील यांना बसला. त्यामुळेच संजय पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सांगली जिल्ह्यासह राज्यभरात मोठी उलथा-पालथ होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी हातात घेण्यासाठी राज्यातील अनेक बडे नेते तयारीत असतानाच भाजपचे नेते आणि सांगलीचे माजी खासदार संजय पाटील यांनी बुधवारी पुणे येथे शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील हे भाजपकडून तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून राोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात भाजप विरूद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात राजकीय संघर्ष सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत मा. खासदार संजय पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली असून सांगली जिल्ह्यात या भेटीने खळबळ उडाली आहे.
पुतळा अनावरण निमंत्रणासाठी भेट : संजयकाका
सांगली येथे मराठा समाज सांस्कृतिक भवन मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा चार ऑक्टोबर रोजी सांगलीत होणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्षपद माझ्याकडे आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवारांची पुणे येथे भेट घेतली होती. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे संजयकाका पाटील यांनी सांगितले.