For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

संजय सिंह यांची जामिनावर सुटका

06:49 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
संजय सिंह यांची जामिनावर सुटका

दिल्लीतील मद्यधोरण घोटाळा प्रकरणात दिलासा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीच्या गाजलेल्या मद्यधोरण घोटाळ्यातील आरोपी आणि आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांची जामिनावर सुटका करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यांच्या जामीन याचिकेला ईडीनेही विरोध केला नाही. त्यांची चौकशी पूर्ण झाल्याने त्यांना जामीन देण्यास आमचा विरोध नाही, असे ईडीकडून न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर त्यांची याचिका संमत करण्यात आली.

Advertisement

संजय सिंह हे मद्यधोरण घोटाळ्यातील जामिनावर बाहेर आलेले प्रथम आरोपी ठरले आहेत. हा आमच्यासाठी अत्यंत समाधानाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाने दिली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही याच घोटाळा प्रकरणात दोन आठवड्यांपूर्वी अटक करण्यात आली आहे. संजय सिंह यांच्या जामिनाच्या अटी कनिष्ठ न्यायालयाने निर्धारित कराव्यात. संजय सिंह यांनी अटींचे काटेकोर पालन करावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Advertisement

4 ऑक्टोबर 2023 मध्ये अटक

संजय सिंह यांना 4 ऑक्टोबर 2023 या दिवशी अटक करण्यात आली होती. त्याआधी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर आणि कार्यालयावर ईडीने धाडी घातल्या होत्या. संजय सिंह हे मद्यधोरण घोटाळ्याच्या कटातील प्रमुख सूत्रधार असून त्यांना दोन कोटी रुपयांची लाच मिळाली आहे, असा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी उद्योगपती दिनेश अरोरा आणि अमित अरोरा यांच्याशी संजय सिंह यांचे नजीकचे संबंध आहेत, असेही ईडीचे म्हणणे आहे.

तीन नेते होते अटकेत

मद्यधोरण घोटाळा प्रकरणी आम आदमी पक्षाच्या तीन नेत्यांना आजवर कारागृहात वास्तव्य करावे लागले आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे आजही अटकेत आहेत. मद्यधोरण निर्धारित करण्यात आले, तेव्हा ते दिल्लीचे उत्पादन शुल्क मंत्रीही होते. नवे मद्यधोरण ठरविण्यात सिसोदिया यांची मुख्य भूमिका होती, असा आरोप ईडीने त्यांच्यावर ठेवलेला आहे.

ही दोषमुक्तता नाही

कोणत्याही आरोपात आरोपीची जामिनावर मुक्तता झाली, तरी त्याचा अर्थ आरोपी दोषमुक्त झाला, असा होत नाही. त्याला न्यायालयात अभियोगाला सामोरे जावेच लागते. अभियोगात तो दोषी आढळल्यास त्याला न्यायालय देईल ती शिक्षाही भोगावी लागते. त्यामुळे जामिनावर मुक्तता हा केवळ एक दिलासा असतो. त्यातून मोठा अर्थ काढला जाऊ शकत नाही, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :
×

.