Sanjay Raut On MLC Result "एकनाथ शिंदेंचा वापर फडणविसांच्या विरोधात दिल्लीतून होतोय" विधानपरिषद निकालानंतर खा. संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ
महाराष्ट्र विधासभेतील १७ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत महायुतीने १६ जागांवर दणदणीत विजय मिळवला तर उर्वरित एका जागेवर भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांची विजयाची मोहोर उमटवली आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले की, या निकालामुळे महायुतीतला छुपा संघर्ष चव्हाट्यावर आला असून, निवडणूकीत पैशांचा प्रचंड वापर झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
फडणविसांच्या चेहऱ्यावरचं खोटं हसू
निकालानंतर राऊत म्हणाले की, या निकालामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यातलं नातंही आता स्पष्ट झालं आहे, "फडणविसांच्या चेहऱ्यावरचं हसूही खोटं आहे, शिंदे गट बाजूला असल्यानंतर भाजपचं असताना भाजपमध्ये काय सुरुय, हे सगळ्यांना दिसत आहे"
शिंदेंना दिल्लीतून बळ
दरम्यान निकालानंतर प्रतिक्रिया देताना राऊत असंही म्हणाले की, एकनाथ शिंदेंना दिल्लीतून बळ दिलं जातंय आणि त्यांचा वापर राज्यात फडणविसांच्या विरोधात सुरुय, भाजपमध्ये आता कोल्ड नाही तरओपन वॉर सुरुय. शिंदेंचा वापर राज्यातल्या भाजप नेतृत्वाच्या अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या विरोधात केल्यामुळे नाशिकमधील शिंदेंचा उमेदवार भाजपने पाडल्याचा धक्कादायक आरोप खा. राऊत यांनी केला.
निवडणूकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर
निकालानंतर संजय राऊत यांनी विधानपरिषदेच्या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राला कमकुवत करण्यासाठी शिवसेना फोडल्याचाही पुर्नरुच्चार यावेळी संजय राऊत यांनी केला. आपली प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या बंडखोर खासदारांचा मुद्दा मांडताना राऊत म्हणाले "हा सगळा डाव राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्यासाठी आखला गेलाय, आमदार खासदार फोडले तरी शिवसैनिकांची लढण्याची जिद्द आणि ताकद संपवता येणार नाही"
एकनाथ शिंदे हे अमित शाहांचे कॉन्ट्रॅक्ट किलर
नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांच्या विजयाचा संदर्भ देत हा विजय भाजपने शिंदेंच्या विरोधात घडवून आणल्याचा आरोप करत त्यामुळे महायुतीतला अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शाह यांचे कॉन्ट्रॅक्ट किलर असल्याचे म्हटले आहे.
उमेदवारी मागे घेतलेले गिते जिंकले कसे?
नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याविरोधात थेट शड्डू ठोकत मैदानात उतरले होते. अखेर उदय सामंत, गिरीश महाजन यांनी मनधरणी केल्यानंतर अखेर गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे या दोन उमेदवारांनी माघार घेतली होती पण अखेरपर्यंत त्यांची नावे मतपत्रिकेवर होती असा आरोप महायुतीचे पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केला. तर नाशिकच्या ,या निकालावर संजय राऊत यांनी हा मोठा चमत्कार असल्याचे म्हटले आहे.