भगवद् भक्ती प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी संजय पुनाळेकर
सन २०२६ ते २०२९ च्या कालावधीसाठी फेरनिवड
वेंगुर्ले (वार्ताहर)-
भगवद् भक्ती प्रबोधिनी सिंधुदुर्ग च्या पिंगुळी मठ येथील दत्त मंदिर येथे झालेल्या सभेत सन २०२६ ते २०२९ या तीन वर्षासाठी निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणी जिल्हाध्यक्षपदी संजय पुनाळेकर यांची एकमताने फेर निवड करण्यात आली.भगवद् भक्ती सिंधुदुर्गच्या नूतन कार्यकारिणी निवडीची सभा दत्तमंदिर सभागृह राऊळ महाराज मठ पिंगुळी येथे मावळते अध्यक्ष संजय पुनाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी या प्रबोधिनीचे सर्व संस्था कार्यकारिणी संचालक तसेच सदस्य उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्हयातील सुमारे १७५ कीर्तनकारांची ही संस्था असून यातील बहुतांश कीर्तनकार सिंधुदुर्ग ,गोवा, कर्नाटक येथे कीर्तने सादर करीत असतात. या संस्थेमार्फत श्रावणमास कार्यक्रम, ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळा कार्यक्रम, तुकाराम बीज कार्यक्रम, नारद जयंती कार्यक्रम असे मोठे उपक्रम घेतले जातात. अनेक नवोदित कीर्तनकारांना मार्गदर्शन केले जाते.दर तीन वर्षांनी या संस्थेच्या कार्यकारिणीची निवड सर्व कीर्तनकारातून केली जाते. सन २०२६ ते २०२९ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी कार्यकारणीची निवड करण्यात आली यामध्ये मागील जिल्हाध्यक्ष संजय पुनाळेकर (वेंगुर्ले) यांची पुन्हा एकदा त्यांचे उत्कृष्ठ असल्याने जिल्हाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. तर प्रबोधिनीच्या सेक्रेटरी पदी हृदयनाथ गावडे (कुडाळ) आणि खजिनदारपदी प्रशांत धोंड पिंगुळी यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारीणीत उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम काजरेकर (घोटगे), सदस्यपदी दिनकर प्रभू केळुसकर (कुडाळ), किशोर राणे, गुरुदास केळुसकर (कणकवली), रामचंद्र मेस्त्री (कालेली), महेश बोवलेकर (मठ-वेंगुर्ले), अवधूत नाईक (वेंगुर्ले-वायंगणी), सौ. केतकी सावंत (पोखरण), सौ. श्रद्धा ठाकूर (म्हापण) यांचा समावेश आहे.