Kolhapur : ठाकरेंच्या सेनेला खिंडार, Harshal Surve, Sanjay Pawar यांचा पदाचा राजीनामा
सुर्वे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहीत पदाचा राजीनामा दिला
Sanjay Pawar and Harshal Surve Marathi News: कोल्हापुरात ठाकरे गटांत जिल्हाप्रमुख पदावरून वाद सुरु आहे. काल कोल्हापुरात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी रविकरण इंगवले यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. इंगवले यांची जिल्हाप्रमुखपदी निवड होताच त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास हर्षल सुर्वे यांनी नकार दिला.
दरम्यान, प्रथम हर्षल सुर्वे आणि आता उपनेते संजय पवार या दोन्ही कार्यकर्त्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले असल्याची चर्चा सुरु आहे.
आज सकाळी शिवसेना ठाकरे गटाच्या हर्षल सुर्वे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहीत पदाचा राजीनामा दिला. यानंतर उपनेते संजय पवार यांनीही काही वेळात आपली भूमिका स्पष्ट करत ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केला. त्यामुळे कोल्हापुरात आता ठाकरे गटाचे भवितव्य काय असा सवाल राजकीय वर्तुळातून होत आहे.
बनावटगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्याला आम्ही उरावर बसवून घेणार नाही, आमचे खांदे सुद्धा मजबूत आहेत, असे वक्तव्य हर्षल सुर्वे यांनी केले होते. कोणाला उरावर घ्यायचं आणि कुणाला पायात ठेवायचे हे आम्ही ठरवू असा इशारा हर्षल सूर्वे यांनी पक्षातील वरिष्ठांना दिला होता. दरम्यान, आज सेनेच्या दोन्ही प्रमुख सदस्यांनी राजीनामे दिल्याने आता कोल्हापुरात ठाकरे गटाचे काय असा सवाल होत आहे.
हर्षल सुर्वेंनी पत्रात काय लिहलंय?
साहेब माझी जिल्हाप्रमुख पदी निवड झाली नाही. त्यामुळे मनातील खदखद व्यक्त केली होती. मात्र आदित्य साहेबांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली,तीच जास्त जिव्हारी लागली. आजपर्यंत आदेश मानूनच काम केले होते. कधी आदेश डावलला नाही. पण आता आदित्य साहेबांचा आदेश आला निर्णय मान्य नसेल तर निघून जावा. मला निर्णय मान्य नाही साहेब. साहेबांचा आदेश मानून पक्षातून निघून जात आहे. मी माझ्या पदाचा आणि सक्रिय सभासदाचा राजीनामा देत आहे.