संजय मिश्रा अन् नीना गुप्ताची जोडी पुन्हा जमणार
मानवीय भावना आणि नैतिक दुविधांनी भरलेली नवी कहाणी आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. निर्माता लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘वध 2’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. ‘वध 2’ हा चित्रपट 6 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या कहाणीची आम्ही निर्मिती केली आहे. या कहाणीवर विश्वास ठेवल्याबद्दल मी लव रंजन आणि अंकुर यांचा आभारी असल्याचे दिग्दर्शक जसपाल सिंह संधूने म्हटले आहे.
जसपालनेच ‘वध 2’ चित्रपटाची कहाणी लिहिली आहे. हा चित्रपट ‘वध’ चित्रपटाची कहाणी पुढे नेणार असून यात नव्या व्यक्तिरेखांद्वारे भावना आणि स्थितीला एका नव्या स्वरुपात गुंफण्यात आले आहे. निर्मात्यांनी संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. या पोस्टरमुळे चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 2022 मध्ये वध चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. क्राइम थ्रिलर स्वरुपात 3 वर्षांपूर्वी प्रदर्शित या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. तसेच समीक्षकांकडूनही चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. अशास्थितीत आता सुमारे 4 वर्षांनी वध फ्रेंचाइजीचा दुसरा चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर केला जाणार आहे.